मुंबई : चीनमधील एव्हरग्रॅन्डे समूहाच्या दिवाळखोरीचे जागतिक अर्थव्यवस्थेला ग्रहण लागण्याची भीती कमी झाल्याने स्थानिक भांडवली बाजारात निर्देशांकांनी मंगळवारी पुन्हा उसळी घेतली.  सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने घसरणीने सुरुवात केली, मात्र दुपारनंतर बाजार सावरत गेला. दिवसअखेर सेन्सेक्सने सोमवारची संपूर्ण पडझड भरून काढत, ५१४.३४ अंशांच्या वाढीसह ५९,००५.२७ अंश ही मजल गाठली. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये १६५.१० अंशांची वाढ झाली आणि दिवस सरताना तो १७,५६२ अंशावर स्थिरावला. सोमवारच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान, धातू आणि वित्त कंपन्यांच्या समभागांना घसरणीचा मोठा फटका बसला होता. मंगळवारी याच क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांकडून मोठी मागणी मिळविली. 

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचा समभाग ४.९४ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ इंडसइंड बँक, आयटीसी, बजाज फिनसव्र्ह, टाटा स्टील, एचसीएल टेक, टेक महिंद्र आणि इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे मारुती, बजाज ऑटो, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, पॉवरग्रिड आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या समभागात प्रत्येकी २.५४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रांमधील समभागही सोमवारच्या पडझडीतून सावरताना दिसले. परिणामी, मंगळवारी प्रमुख निर्देशांकामध्ये जोरदार तेजी दिसून आली. विशेषत: मध्यान्हानंतर, युरोपातील तेजीसह खुल्या झालेल्या बाजारातील सकारात्मक संकेतामुळे उत्तरार्धात भारतीय भांडवली बाजारात उत्साह संचारला आणि गुंतवणूकदारांकडून पडझड झालेल्या समभागात खरेदी वाढली, असे जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या सेमीकंडक्टर कमतरतेच्या समस्येमुळे दुपारच्या सत्रात वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग विक्रीच्या दबावाखाली होते.

१०७ दिवसात एक कोटी नवगुंतवणूकदार

मुंबई : तेजीच्या आकर्षणाने नवगुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे मोर्चा वळविला आहे. याचाच सुपरिणाम म्हणजे मुंबई शेअर बाजाराने ६ जून ते २१ सप्टेंबर या अवघ्या १०७ दिवसांत एक कोटी गुंतवणूकदार खात्यांची भर घालत, एकूण संख्या आठ कोटींवर गेली आहे. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षात ६ जून रोजी नोंदणीकृत गुंतवणूकदार ग्राहकांच्या संख्येने सात कोटींचा आकडा ओलांडला आहे.