सेन्सेक्स ५१ हजार पार; निफ्टी १५,३०० पुढे

सेन्सेक्स १० मार्चनंतर प्रथमच ५१ हजारावर पोहोचला आहे.

गुंतवणूकदारांची बँक, वित्त क्षेत्रातील समभागांना पसंती

मुंबई : मंगळवारच्या संमिश्र वाटचालीनंतर भांडवली बाजारात बुधवारी पुन्हा एकदा तेजी नोंदली गेली. आशियाई प्रमुख निर्देशांकांच्या वाढीच्या जोरावर येथे सेन्सेक्स ५१ हजार तर निफ्टी १५,३०० चा टप्पा पार करता झाला.

दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात अनुक्रमे ३८० अंश व ९३ अंश भर पडली. सेन्सेक्स व निफ्टी मंगळवारी संमिश्र वाटचाल करणारे ठरले होते. तुलनेत बुधवारी त्यात जवळपास पाऊण टक्क्यापर्यंत वाढ नोंदली गेली.

गुंतवणूकदारांनी खरेदी करताना विशेषत: बँक, वित्त तसेच माहिती तंत्रज्ञान, वाहन क्षेत्रातील समभागांकरिता पसंती दर्शवली. सेन्सेक्स सत्रअखेर ५१,०१७.५२ तर निफ्टी १५,३०१.४५ वर पोहोचला.

निफ्टीत गेल्या सलग चौथ्या व्यवहारात तेजी नोंदली गेली आहे, तर सेन्सेक्स १० मार्चनंतर प्रथमच ५१ हजारावर पोहोचला आहे. भांडवली बाजारात बुधवारच्या सुरुवातीच्या सत्रापासूनच खरेदीचा अधिक दबाव होता. मुंबई निर्देशांकातील बजाज फिनसव्र्ह सर्वाधिक, जवळपास ५ टक्क्यांसह झेपावला. तसेच बजाज फायनान्स, इन्फोसिस, मारुती सुझुकी, एचडीएफसी लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्र, महिंद्र अँड महिंद्र आदीही वाढले.

पॉवरग्रिड, एनटीपीसी, ओएनजीसी, कोटक महिंद्र, डॉ. रेड्डीज्, एचडीएफसी बँक, आयटीसी, भारती एअरटेल आदी मात्र ३ टक्क्यांपर्यंत घसरले. कंपन्यांच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारात काही प्रमाणात जाणवला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता निर्देशांकही २.८५ टक्क्यांपर्यंत वाढला. तर पोलाद, ऊर्जा, बहुपयोगी वस्तू, मूलभूत वस्तू निर्देशांक काही प्रमाणात घसरले. मिड कॅप ०.१४ टक्क्यांनी वाढला, तर स्मॉल कॅप ०.६९ टक्क्यांनी घसरला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex nifty investors bank akp