अर्थप्रोत्साहनाने बाजाराला स्फुरण

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वाढलेले रुपयाचे मूल्य आणि परकीय भांडवलदारांकडून वाढत्या पैशांच्या ओघामुळे भांडवली बाजाराने उत्साह दुणावण्याचे काम केले.

सेन्सेक्स-निफ्टीची ऐतिहासिक उच्चांकावर झेप

मुंबई : केंद्र सरकारने दूरसंचार आणि वाहन निर्मिती क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या अर्थ प्रोत्साहनामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील तेजीने भांडवली बाजारातही खरेदीपूरक उत्साह निर्माण केला. परिणामी बुधवारी पुन्हा सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर झेप घेतली.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वाढलेले रुपयाचे मूल्य आणि परकीय भांडवलदारांकडून वाढत्या पैशांच्या ओघामुळे भांडवली बाजाराने उत्साह दुणावण्याचे काम केले. या सर्व घटकांमुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४७६.११ अंशांच्या कमाईसह ५८,७२३.२० या अभूतपूर्व उच्चांकी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसभरात ५८,७७७.०६ या सार्वकालिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला. याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील दिवसभरात १७,५३२.७० अंशांची सर्वोच्च पातळी गाठली. दिवसअखेर निफ्टी १३९.४५ अंशांनी वधारून १७,५१९.४५ पातळीवर स्थिरावला.

केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार क्षेत्रासाठी दिलासादायी अर्थ प्रोत्साहन मंजूर केले. शिवाय स्वयंचलित मार्गाने १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी दिली आहे. याचबरोबर मंत्रिमंडळाने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वाहन आणि त्याच्याशी निगडित सुटे भाग उद्योग आणि ड्रोन उद्योगासाठी २६ हजार कोटी रुपयांचे उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली.

‘दूरसंचार आणि वाहन उद्योगासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना दूरगामी आणि फायदेशीर परिणामांच्या संभाव्यतेसह व्यापक आहेत. दूरसंचार आणि वाहन उद्योगाबरोबरच हे निर्णय बँकिंग क्षेत्रासाठी देखील सकारात्मक आहेत. कारण बँकांकडून या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा झाला असून, त्या संबंधाने जोखीम लक्षणीय घटेल,’ असे जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे गुंतवणूक रणनीतीकार व्ही.के. विजयकुमार म्हणाले. सेन्सेक्समधील सर्वच उद्योग क्षेत्रवार निर्देशांक बुधवारी सकारात्मक पातळीवर होते.

गुंतवणूकदारांच्या मत्तेत ३.३६ लाख कोटींची भर

बाजारात सलग दोन दिवस असलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत ३.३६  लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. सेन्सेक्सने दोन सत्रात ५४६ अंशांची कमाई केली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजाराचे भांडवल २,५९,६८,०८२.१८ कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex nifty share market index akp 94

ताज्या बातम्या