रशियन आक्रमणाचे भयानक पडसाद

गुंतवणूकदारांचे १३.४४ लाख कोटींनी नुकसान

मुंबई : रशियाने युक्रेनवर गुरुवारी पहाटे केलेल्या आक्रमणाचे जागतिक भांडवली बाजारातील उमटलेल्या भीतीदायी प्रतिक्रियेचे प्रतिबिंब स्थानिक बाजारातही उमटले. परिणामी झालेल्या मागील दोन वर्षांतील सर्वात मोठय़ा घसरणीत ‘सेन्सेक्स’ पावणेपाच टक्के म्हणजे तब्बल २,७०० अंशांनी कोलमडला. करोनाच्या उद्रेकापश्चात मार्च २०२० मध्ये धास्तावलेल्या गुंतवणूकदारांकडून झालेल्या तुफान विक्रीचाच पुन्हा एकदा प्रत्यय बाजाराला आला आणि या पडझडीत गुंतवणूकदारांना त्यांच्या १३.४४ लाख कोटी रुपयांची मत्ता मातीमोल झाल्याचे पाहावे लागले.

आशियाई बाजारातील पडझडींचे अनुकरण, बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी मोठय़ा आपटीसह गुरुवारच्या व्यवहाराला सुरुवात केली. एकेसमयी बुधवारच्या तुलनेत २,८५० अंशांपर्यंत घसरणीची मात्रा विस्तारली होती. दिवसाची अखेरही जवळपास त्याच पातळीवर म्हणजे २,७०२.१५ अंशांच्या नुकसानीसह, सेन्सेक्सने ५४,५२९.९१ या पातळीवर केली. बरोबरीने निफ्टी निर्देशांकही ८१५.३० अंशांच्या (४.७८ टक्के) घसरगुंडीसह १६,२४७.९५ वर स्थिरावला. दोन्ही मुख्य निर्देशांकांमध्ये सलग सातव्या सत्रात झालेली ही घसरण आहे.

युक्रेनच्या भूभागावर रशियन सैन्याकडून हल्ले सुरू आहेत. घुसखोरीचे प्रमाण किती मोठे असेल हे पाहिले जात आहे, तथापि अमेरिका व पश्चिमी राष्ट्रांची रशियाविरोधात कठोर निर्बंधांचा धोकाही बळावला आहे. ज्याचे परिणाम रशियासह, संपूर्ण जगालाही भोगावे लागणार आहेत. त्यामुळे भांडवली बाजार जागतिक स्तरावर पडझड सुरू आहे. नकारात्मक भावनांची बाजारावर दाट छाया असून, त्यातून बाजाराला विक्रीची दिशा दिली जात आहे, असे निरीक्षण ज्युलियस बेअर या दलाली पेढीचे रणनीतीकार लिओनाडरे पेलांडिनी यांनी नोंदविले.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विक्रीत पुढाकार राहिला असून, मागील सलग सात दिवस सुरू राहिलेल्या समभाग विक्रीत त्यांनी दिवसाला सरासरी ३,५०० ते ४,००० कोटी रुपे मूल्यांची समभाग विक्री करून गुंतवणूक मायदेशी माघारी नेली आहे.

रशिया हा जगातील एक मोठा खनिज तेल निर्यातदार असला, तरी भारताकडून होणाऱ्या तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा अत्यंत नगण्य आहे.

करोना उद्रेकानंतरची चौथी मोठी घसरण

करोना विषाणूजन्य साथीच्या देशातील उद्रेकाला प्रतिबंध म्हणून मोदी सरकारने देशव्यापी टाळेबंदीचा निर्णय घेतला, त्याचे पडसाद म्हणून २३ मार्च २०२० रोजी ‘सेन्सेक्स’ला ४,०५३.१३ अंशांच्या नुकसानीचे खिंडार पडले होते. त्यानंतरची सर्वात मोठी २,७०० अंशांची घसरण गुरुवारी झाली. त्याच काळात, इतिहासातील सर्वात मोठय़ा घसरणी सेन्सेक्सने अनुभवल्या आहेत. करोनाच्या सावटात, १३ मार्च २०२० रोजी ३,३८९ अंश, १२ मार्च २०२० रोजी ३,२०४ अंश आणि १६ मार्च २०२० रोजी सेन्सेक्स २,८२७ अंशांनी कोसळला आहे.

आघाडीच्या ७७ समभागांचे भाव तळाला

बाजारात गुरुवारी विक्रीवाल्यांचा इतका जबरदस्त वरचष्मा होता की, सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या सर्वच्या सर्व ३० समभागांमध्ये चार ते पाच टक्क्यांपर्यंत मूल्य घसरून दिसून आली. इंडसइंड बँकेत सर्वाधिक ७.८८ टक्क्यांची घसरण झाली. तसेच बाजार भांडवली मूल्याच्या दृष्टीने अव्वल ५०० कंपन्यांच्या (बीएसई ५०० निर्देशांकातील) समभागांपैकी ७७ समभागांच्या किमती गुरुवारी वर्षांतील नीचांक स्तर गाठणाऱ्या ठरल्या. डॉ. रेड्डी, एक्साइड इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाइफ, अपोलो टायर्स, भारत पेट्रोलियम, डीसीबी बँक, एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट, जिलेट इंडिया आणि वॉखार्ट अशा नावाजलेल्या समभागांना या पडझडीचा मोठा फटका बसला.

रुपया गडगडला; डॉलरमागे ७५.६३ वर

मुंबई : युक्रेनप्रकरणी रशियाने लष्करी कारवाया सुरू केल्यानंतर गुरुवारी अमेरिकी चलनाच्या तुलनेत रुपया १०२ पैशांनी घसरून ७५.६३ पातळीवर बंद झाला. भारताकडून आयात होणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती प्रति पिंप १०० डॉलरवर कडाडल्या असून, त्यात नजीकच्या काळात तीव्र गतीने वाढ होण्याच्या कयासांनी चलन बाजारात आणखीच दाणादाण निर्माण केली.

तेल १०३ डॉलरवर

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (ब्रेंट क्रूड) किमती प्रति पिंप १०३ अमेरिकी डॉलरवर गेल्या. एकाच दिवसात पिंपामागे तब्बल ८ डॉलरच्या मोठय़ा उसळीने तेलाचे दर पुन्हा सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. तथापि, युद्धाचा भडका झाला तरी त्याने भारताच्या पुरवठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही तेल मंत्रालयातील उच्च सरकारी अधिकाऱ्याने दिली.

भारताकडून आयात होणाऱ्या तेलाच्या दरासाठी मानदंड ठरणाऱ्या ब्रेंट क्रूडच्या किमती गुरुवारी दुपारी आंतरराष्ट्रीय बाजारात पिंपामागे १०३.७८ डॉलर या पातळीवर होत्या. व्यवहारात त्या ६.९३ टक्क्यांनी उसळल्या. सात वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट २०१४ रोजी दिसलेल्या १०३.४० डॉलर असा यापूर्वीचा दर-उच्चांकही त्यामुळे मागे पडला आहे. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर रोखून ठेवल्याने ग्राहकांसाठी या जागतिक तेल भडक्याच्या तूर्त तरी झळा बसणार नाहीत.