scorecardresearch

तापलेल्या तेलाने बाजाराची होरपळ; ‘सेन्सेक्स’मध्ये ३६६ अंश घसरण

जागतिक पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने किमती पिंपामागे १२० डॉलरच्या घरात पोहोचल्या आहेत.

‘सेन्सेक्स’मध्ये ३६६ अंश घसरण

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धभडक्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या खनिज तेलाच्या किमतीमुळे गुरुवारी सकाळच्या सत्रातील उसळीला निर्देशांकांना तिलांजली वाहावी लागली. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने दुपारच्या सत्रात नफावसुलीसाठी सुरू झालेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकात घसरण झाली.

जागतिक पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने किमती पिंपामागे १२० डॉलरच्या घरात पोहोचल्या आहेत. पाश्चात्त्य राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध अधिक कडक केले आहेत. ज्यामुळे तेलाच्या पुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या जागतिक तेल उत्पादनात रशियाचा सुमारे १० टक्के वाटा आहे.

प्रतिकूल घडामोडींचे पडसाद उमटत, दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६६.२२ अंशांच्या घसरणीसह ५५,१०२.६८ पातळीवर बंद झाला. गुरुवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ५२७.७२ अंशांची झेप घेतली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १०७.९० अंशांची घसरण झाली. दिवसअखेर तो १६,४९८.०५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीसह देशातील इंधनाच्या दरात स्थिरता राहावी यासाठी अमेरिकेबरोबरच भारताने तेलाचे धोरणात्मक साठे खुले केले आहेत. तसेच ‘ओपेक’कडून उत्पादनात वाढीसाठी सहमती झाल्यामुळे भविष्यात खनिज तेलाच्या किमती कमी होणे अपेक्षित आहे. येत्या आठवडय़ात देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल, जागतिक पातळीवरील युद्धासंबंधी घडामोडी आणि अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून होणाऱ्या व्याजदरवाढीकडे बाजाराचे बारीक लक्ष असेल, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex nifty share market index akp 94

ताज्या बातम्या