सलग सातव्या दिवशी निर्देशांकांची शिखर चढाई

मुंबई : जगभरात अन्यत्र गुंतवणूकदारांनी अनुसरलेली जोखमीसंबंधी सावधगिरी पाहता तेथील भांडवली बाजारांनी नरमाईकडे वळण घेतले असले तरी स्थानिक बाजारातील तेजावाल्यांचा उन्माद ओसरताना दिसत नाही. परिणामी सोमवारी सलग सातव्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी त्यांचे नवीन अत्युच्च स्तर नोंदविले. सेन्सेक्स आता ६२ हजारांच्या शिखरापाशी पोहचला असून, निफ्टीने १८,५०० ची वेस गाठली आहे.

माहिती-तंत्रज्ञान, बँका आणि धातू क्षेत्रातील समभागांची बेफाम खरेदी, तर दुसऱ्या बाजूला वरचा भाव गाठलेल्या औषध निर्माण आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची नफा पदरी बांधून घेण्यासाठी विक्री असे सोमवारी बाजारातील व्यवहाराचे संमिश्र चित्र होते.

चीनच्या अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी म्हणजे जुलै ते सप्टेंबर तिमाहीत नोंदविलेली अवघी ४.९ टक्क्यांची वाढ आणि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती पिंपामागे ८५ डॉलरच्या पातळीपर्यंत कडाडल्याने जागतिक भांडवली बाजारात मंदीसदृश वातावरण होते. तरीही मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने सोमवारच्या व्यवहारांची सुरुवात मोठ्या मुसंडीसह केली. दिवसाच्या व्यवहारात, ६२ हजारांचा अभूतपूर्व टप्पा गाठण्याच्या बेताने घोडदौड सुरू असलेल्या ‘सेन्सेक्स’ने ६१,९६३.०७ अशा उच्चांकापर्यंत मजलही मारली. मात्र दिवसाची अखेर त्याने ६१,७६५.५९ वर म्हणजे गुरुवारच्या तुलनेत ४५९.६४ अंशांची कमाई करीत केली. बरोबरीने निफ्टी निर्देशांकानेही १८,५४३.१५ असा व्यवहारादरम्यान नवीन सार्वकालिक उच्चांक स्थापित केला. दिवस सरत असताना मात्र त्याने १३८.५० अंशांची नव्याने भर घालत, १८,४७७.०५ पातळीवर विश्राम घेतला.

निर्देशांक निर्धारित करणाऱ्या ३० समभागांमध्ये इन्फोसिसचा समभाग ४.४७ टक्क्यांच्या वाढीसह अग्रेसर ठरला. त्यापाठोपाठ टेक महिंद्र, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, मारुती, स्टेट बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांनी चांगली कमाई केली. त्या उलट, एचसीएल टेक, महिंद्र अँड महिंद्र, डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल या समभागांचे भाव नरमल्याचे दिसले.

गुंतवणूकदारांनी  पुढे काय करावे?

बाजारात निर्देशांकांची हालचाल इतक्या दमदारपणे सुरू आहे की चढ्या मूल्यांकनाच्या चिंतेने त्याला इतक्यात ग्रहण लागण्याची शक्यता दिसून येत नाही. अर्थात अल्पावधीत बाजारातील चढ-उतार हे सकारात्मक व प्रतिकूल बातम्यांच्या ओघानुरूप दिसून येतील. अशा स्थितीत बाजारात दीर्घावधीच्या धारणेने गुंतवणूक करणाऱ्यांनी मूल्यांकन जास्त असलेल्या समभागांची खरेदी टाळावी. उच्च दर्जाच्या समभागांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी गुंतवणूक मात्र सुरूच ठेवली पाहिजे.

  व्ही. के. विजयकुमार, मुख्य गुंतवणूक रणनीतीकार, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

तिसऱ्या लाटेचा निवळलेला धोका, १०० कोटींच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली लसीकरणाची मोहीम आणि कैक राज्यांमध्ये लक्षणीय रोडावलेली करोना रुग्णसंख्या व शून्यवत झालेले मृत्यूचे प्रमाण, या सकारात्मक घटकांच्या परिणामाने भारतीय अर्थव्यवस्था जोरदार उसळी घेऊन गती पकडेल अशा उत्साही भावनांचा बाजारावर तगडा प्रभाव आहे. जगभरात प्रमुख मूलभूत धातूंच्या किमतींवर लक्ष ठेवून धातू कंपन्यांच्या समभागांना बाजारात मोठी मागणी निर्देशांकांच्या तेजीत भर घालत आहे.

’   नरेंद्र सोळंकी, समभाग संशोधन प्रमुख आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स