संवत्सराच्या प्रारंभी ‘सेन्सेक्स’ची त्रिशतकी झेप

मुंबई : भांडवली बाजारासाठी अनेकांगाने संस्मरणीय आणि गुंतवणूकदारांसाठी भरभराटीच्या राहिलेल्या वर्षात, दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर गुरुवारी झालेले मुहूर्ताचे व्यवहार हे आगामी संवत्सर २०७८ साठी आशादायी मनोरथ रचणारे ठरले. मुख्य निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ने या तासाभराच्या व्यवहारात अर्धा टक्क्यांहून अधिक कमाईसह सकारात्मक सुरुवात केली.

नवीन २०७८ सवंत्सराचे स्वागत म्हणून परंपरेने मुहूर्ताचे व्यवहार भांडवली बाजारात विधिवत लक्ष्मीपूजनानंतर होत असतात. बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री हिच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी पारंपरिक घंटानाद करून मुहूर्ताच्या व्यवहारांना सुरुवात झाली.

सत्रारंभ ‘सेन्सेक्स’मध्ये ३५९ अंशाच्या दमदार वाढीसह ६०,१३१ पातळीवरून झाला. निफ्टी निर्देशांकानेही सत्राला सुरुवात १४४ अंशांच्या मोठ्या मुसंडीसह केली. सायंकाळी ७.१५ वाजता या विशेष व्यवहारांच्या सत्रअखेरीस सेन्सेक्स २९५.७ अंशांनी वधारून ६०,०६७.६२ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८७.६ अंशांची वाढ झाली आणि तो १७,९१६.८० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये महिंद्र अँड महिंद्रचा समभाग २.८७ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ आयटीसी, बजाज ऑटो, लार्सन अँड टुब्रो आणि कोटक बँकेचे समभाग तेजीत राहिले. दुसरीकडे डॉ.रेड्डीज, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक घसरणीसह बंद झाले. सेंसेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी फक्त चार कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. उल्लेखनीय म्हणजे व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल आणि मिड कॅप निर्देशांकात अनुक्रमे १.३६ टक्के व पाऊण टक्क्यांची तुलनेने सरस वाढ दिसून आली.