‘सेन्सेक्स’ची फेरउसळी; ‘ओमायक्रॉन’बाधेची चिंता कमी झाल्याने

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८८६.५१ अंशांच्या वाढीसह ५७,६३३.६५ पातळीवर बंद झाला.

‘ओमायक्रॉन’बाधेची चिंता कमी झाल्याने

मुंबई : जागतिक बाजाराच्या कलानुसार, तेजी-मंदीचे हिंदोळे भांडवली बाजारात सुरू आहेत. सोमवारच्या सहस्रा  अंशांच्या घसरगुंडीनंतर, मंगळवारी ‘सेन्सेक्स’मध्ये ८८७ अंशांच्या मुसंडीला बळ देणारा सकारात्मक बदल गुंतवणूकदारांना अनुभवता आला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि इन्फोसिसचे समभागातील खरेदी निर्देशांकांच्या मोठ्या वाढीस कारणीभूत ठरली.

सलग दोन सत्रांतील पडझडीनंतर, मंगळवारी निर्देशांकांनी मोठी झेप घेण्यामागे, नवीन ओमायक्रॉन वेगाने पसरत असला तरी आधीच्या विषाणूच्या तुलनेत तो कमी हानिकारक असल्याचे, नव्याने पुढे आलेल्या अभ्यासाने स्पष्ट केले आहे. ही बाब जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचे चिंताहरण करून, त्यांना दिलासा देणारी ठरली आहे.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८८६.५१ अंशांच्या वाढीसह ५७,६३३.६५ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २६४.४५ अंशांची भर पडली आणि हा निर्देशांक १७,१७६.७० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग ४ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, स्टेट बँक आणि बजाज फायनान्सचे समभाग तेजीत होते. तर सेन्सेक्समध्ये एकमेव एशियन पेंटचा समभाग घसरणीसह बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कलाचा परिणाम देशांर्तगत भांडवली बाजारावर झाल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दीड टक्क्यांनी वधारले. मात्र आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असला तरी त्याची परिणामकारकता सौम्य असल्याच्या वृत्ताने जागतिक पातळीवरील भांडवली बाजारांना बळ मिळाले. याचबरोबर चीनच्या मध्यवर्ती बँकेने धोरण सुलभता म्हणून रोख राखीव निधी गुणोत्तरात कपात केल्याने बाजारात १८८ अब्ज डॉलरची तरलता निर्माण होणार असल्याने चिनी बाजारांना चालना मिळाली. देशांतर्गत पातळीवर सध्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू असून अल्पकालीन अनिश्चितता लक्षात घेऊन व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले जाण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex nifty share market index akp 94

Next Story
विक्रीच्या माऱ्याने ‘सेन्सेक्स’ची ९४९ अंशांची घसरगुंडी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी