scorecardresearch

‘सेन्सेक्स’मध्ये पाच शतकी झड; आंतरराष्ट्रीय बाजारातील साशंक कल

ब्रिटनमधील ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तीव्र स्वरूपाची वाढ ही जागतिक भांडवली बाजारासाठी चिंतेची बाब बनली आहे

‘सेन्सेक्स’मध्ये पाच शतकी झड; आंतरराष्ट्रीय बाजारातील साशंक कल

आंतरराष्ट्रीय बाजारातील साशंक कल

मुबई : जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि निर्देशांकात वरचष्मा असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच एचडीएफसी लिमिटेड व एचडीएफसी बँकेच्या समभागांतील जोरदार विक्रीच्या दबावामुळे सोमवारी सप्ताहारंभीच भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकानी मोठी घसरण नोंदविली.

संध्याकाळी उशिरा जाहीर होणारा किरकोळ महागाईचा दर आणि प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकाच्या नियोजित बैठका पाहता, गुंतवणूकदारांना सावध पवित्रा अनुसरला. परिणामी, सलग दुसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ५०३.२५ अंशांनी गडगडून, सोमवारी बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा ५८,२८३.४२ या पातळीवर स्थिरावला. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १४३.०५ अंशांनी कोसळून, १७,३६८.२५ पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकात गेल्या आठवड्यात सलग तीन दिवसांच्या उसळीनंतर, शुक्रवारी सप्ताहअखेरीस माफक प्रमाणात घसरण झाली होती.

ब्रिटनमधील ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तीव्र स्वरूपाची वाढ ही जागतिक भांडवली बाजारासाठी चिंतेची बाब बनली आहे, असे जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांनी निरीक्षण नोंदविले. शिवाय, या आठवड्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक, युरोपिय महासंघाची मध्यवर्ती बँक – ईसीबी, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान यांच्या बैठका नियोजित आहेत. व्याजाचे दर, रोख्यांचा परतावा दर आणि एकंदर वित्तीय बाजारपेठांच्या दृष्टीने या बैठकांचे निकाल परिणामकारक ठरतील. त्यामुळे त्या संबंधाने साशंकता म्हणून बाजारात गुंतवणूकदारांचा सावध बनलेल्या पवित्र्याचे चालू आठवड्यात वेगवेगळ्या बाजारात पडसाद उमटताना दिसतील, असे विजयकुमार यांनी सांगितले.

भारतात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री अथकपणे सुरूच आहे. नोव्हेंबरमधील ३३,७९९ कोटी रुपये मूल्याची समभाग विक्री या संस्थांनी केली तर डिसेंबरमध्ये आतापर्यंत १७,६४४  कोटी रुपयांच्या मूल्याचे समभाग त्यांनी विकले आहेत. विशेषत: बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांना या विक्रीचा जबर फटका बसला आहे. सरलेल्या शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांकडून १,०९२.४० कोटी रुपयांचे समभाग विकण्यात आले.

सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकात सोमवारी जवळपास ०.८५ टक्क्यांची घसरण दिसून आली. त्या तुलनेत व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५३ टक्क्यांनी, तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकातील घसरण ही त्याहून कमी म्हणजे ०.२४ टक्क्यांची घसरण झाली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2021 at 00:20 IST

संबंधित बातम्या