मुंबई: करोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनने बाधित रुग्ण भारतात आढळल्याचा भांडवली बाजारात शुक्रवारी गुंतवणूकदारांनी मोठा  धसका घेतल्याचे जाणवले. सकाळपासून बाजारात चौफेर विक्रीचा मारा सुरू झाल्याने सलग दोन सत्रात तेजीला खंड पडून बाजारात घसरण झाली.

केंद्र सरकारने गुरुवारी कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचे शुक्रवारी भांडवली बाजारावर प्रतिकूल पडसाद उमटले. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणात सरलेल्या दिवसात, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७६४.८३ अंशाच्या घसरणीसह ५७,६९६.४६ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०४.९५ अंशांची घसरण झाली. हा निर्देशांक दिवसअखेर १७,१९६.७० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या समभागांत, पॉवर ग्रिडने ४.०३ टक्कय़ांची सर्वात मोठी घसरण नोंदविली. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, टेक महिंद्रा आणि मारुतीच्या समभागांमध्ये घसरण झाली. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्समधील केवळ चार कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग प्रत्येकी ०.७२ टक्कय़ांपर्यंत वधारले.

गुंतवणूकदारांचा सावध कल

सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात झाल्यानंतर निर्देशांकांमध्ये सर्वाधिक योगदान राखणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याने प्रमुख निर्देशांकात तीव्र घसरण झाली. येत्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार असून पुन्हा संसर्ग वाढण्याच्या भीतीचे अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम पाहता, व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.