बाजारात मंदीवाले सक्रिय

मुंबई : जागतिक अर्थव्यवस्थेतील चिंताजनक खुणांचे नकारात्मक पडसाद आणि माहिती-तंत्रज्ञान, वित्त आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात विक्रीचा सपाटा यामुळे मंगळवारी ‘सेन्सेक्स’ तब्बल १,०३२.३५ अंशांपर्यंत गडगडला. तथापि उत्तरार्धात काहीसा सावरून निर्देशांकांनी बहुतांश घसरण भरून काढली.

अत्यंत अस्थिर व्यवहारात मंगळवारच्या अंतिम तासाभरात खरेदीचे पाठबळ मिळाल्याने, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ४१०.२८ अंशांच्या घसरणीसह ५९,६६७.६० अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक – निफ्टीमध्ये १०६.५० अंशांची घसरण झाली. हा निर्देशांक दिवसअखेर १७,७४८.६० अंशांवर स्थिरावला.

माहिती-तंत्रज्ञान निर्देशांकात झालेली पडझड आणि दुसरीकडे इंधन आणि वायू निर्देशांकात आलेल्या तेजीमुळे भारतीय भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळाले. बाजारात दिवसभर अस्थिर वातावरण होते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्देशांकाने तीन टक्क्यांची तेजी दर्शवत चांगली कामगिरी केली. सत्राअखेर बाजार सावरला. मात्र बाजारात मंदीवाल्यांचा जोर अधिक राहिला, असे एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन म्हणाले.

जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि माहिती-तंत्रज्ञान आणि गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात नफावसुलीमुळे बाजारात घसरण झाली. अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातील वाढ, ब्रेंट क्रूडच्या दरातील वाढ आणि चिनी अर्थव्यवस्थेपुढील वाढत्या अडचणीमुळे जागतिक पातळीवर नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. या वातावरणात मंदीवाल्यांनी डाव साधल्याचे मंगळवारी बाजारात चित्र होते.

बाजार घसरणीत असतानाही पॉवरग्रिड, एनटीपीसी, कोल इंडिया, सन फार्मा, टायटन, कोटक बँक आणि डॉ. रेड्डीजचे समभाग दिवसभर तेजीत व्यवहार करत होते.

जागतिक चिंतेची कारणे.. 

तेल ८० डॉलरवर

ल्ल  आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रेंट क्रूडचे दर तीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. विविध देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने टाळेबंदीमध्ये शिथिलता आणल्यामुळे इंधनांच्या मागणीत वाढ होत आहे. परिणामी वाढत्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रतिपिंप ८० डॉलरवर पोहोचले आहे.

चीनमध्ये वीज तुटवडा

ल्ल   चीनमध्ये निर्माण झालेले वीजपुरवठय़ाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. विजेची मागणी आणि पुरवठा संतुलित राखण्यासाठी बहुतांश उद्योगांचे उत्पादन तात्पुरते थांबविले आहे. मात्र चीनमधील विजेच्या तुटवडय़ामुळे जागतिक पुरवठय़ामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमध्ये इंधनटंचाई

*  ब्रिटनमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा असून अनेक ठिकाणी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी टँकर चालवणारे चालक उपलब्ध नाहीत. इंधन तुटवडय़ामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी इंधन भरण्यासाठी लांब रांगा लावल्या आहेत.