विदेशी गुंतवणूकदारांच्या करविषयक संभ्रमतेचे निवारण करणारे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर भांडवली बाजार गेल्या तीन महिन्यांच्या तळातून शुक्रवारी अखेर बाहेर आला. काल अर्थसंकल्पाच्या दिवशी याच बाबीने थरकाप उडविणारी निर्देशांकात त्रिशतकी घसरण दिसून आली होती. आज मात्र ५६.९८ अंश वाढीसह ‘सेन्सेक्स’ १८,९१८.५२ वर जाऊन स्थिरावला तर ‘निफ्टी’ २६.६५ अंश वाढीने ५,७१८.७० पर्यंत पोहोचला.
कुख्यात ‘मॉरिशस मार्गा’ने भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी संस्थांना कर निवासी प्रमाणपत्र (टॅक्स रेसिडेन्सी सर्टिफिकेट) ही करवजावटीच्या दाव्यासाठी आवश्यक एक तरतूद अर्थसंकल्पात बनविली गेली आहे. त्यावर नाराजी व्यक्त करत भांडवली बाजारात काल विदेशी वित्तसंस्थांनी अलिकडच्या काळातील सर्वात मोठी विक्री करून निर्देशांकाला आपटी घ्यावयास लावले होते. तथापि, काल अर्थसंकल्पपश्चात पत्रकार परिषदेत आणि आजही अर्थसंकल्पात असलेल्या कर निवासी प्रमाणपत्राच्या उल्लेखाबाबत चिदंबरम यांनी परोपरीने स्पष्टीकरण दिले. विदेशी गुंतवणूकदारांवर करबोजा येईल असा घेतलेला धसका अनाठायी असल्याचे चिदम्बरम यांनी आवर्जून सांगितले.
सकाळच्या सत्रात १८,९२३ वर व्यवहार सुरू करताना ‘सेन्सेक्स’ तेजीत होता. त्याने दिवसभरात १८,९८८ पर्यंत मजल मारली. त्याच्या सुरुवातीच्या दिवसातील १८८२० नीचांकापासून लगेचच माघार घेतली गेली. अखेर अर्धशतकी वधारणीसह प्रमुख बाजार बंद झाला.
फेब्रुवारीमध्ये फारशी समाधानकारक विक्रीची कामगिरी न बजावूनही वाहन कंपन्यांचे समभाग मूल्य मात्र चढे राहिले. यामध्ये मारुती सुझुकी, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, बजाज ऑटो यांचा उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर एचडीएफसी, एल अ‍ॅन्ड टी, हिंदुस्थान युनिलिव्हरसारखे समभागही वधारले.

रुपयातील घसरण मात्र कायम
डॉलरच्या तुलनेतील स्थानिक चलनातील गेल्या सत्रातील घसरण आजही कायम होती. ५३ पैशांच्या घसरणीमुळे रुपया ५४.८९ पर्यंत खाली आला आहे. गुरुवारच्या व्यवहारातही रुपयाने घसरण नोंदविली होती. चालू आठवडय़ात तीन वेळी भारतीय चलनात घट राखली गेल्यामुळे रुपयाचा प्रवास ५५ च्या तळाकडे जाऊ पाहत आहे.