मुंबई : महागाईच्या धसक्याने अमेरिकी भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर पडझड झाल्याने त्याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारावर उमटले. जागतिक भांडवली बाजारांमध्ये आलेल्या समभाग विक्रीच्या त्सुनामीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील गुंतवणूकदारांनी गुरुवारी समभाग विक्रीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्समध्ये १,४१६ अंशांची घसरण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांप्रमाणे, परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा गुरुवारीही सुरू राहिल्याने त्याचे चलन व्यवहारांवर विपरीत पडसाद उमटले. सलग दुसऱ्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत ऐतिहासिक नीचांकी ७८च्या वेशीजवळ पोहोचला. मंदीवाल्यांचा वरचष्मा राहिलेल्या सत्राच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,४१६.३० अंशांनी म्हणजेच २.६१ टक्क्यांनी घसरत ५२,७९२.२३ पातळीवर बंद झाला. गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सने ५२,६६९.५१ अंशांचा नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४३०.९० म्हणजेच २.६५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा १५,८०९.४० पातळीवर स्थिरावला.

अमेरिकी बाजारात बुधवारच्या सत्रात ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. वाढत्या महागाईमुळे अमेरिकी कंपन्यांच्या महसुलावर परिणाम झाल्याने त्याचे प्रतिकूल पडसाद अमेरिकी भांडवली बाजारात उमटले. आर्थिक महामंदीच्या वाढत्या भीतींमुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत भांडवली बाजारातून निधीचे निर्गमन सुरू असल्याने प्रमुख निर्देशांकात अडीच टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सध्याच्या अत्यंत अस्थिर बनलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी ग्राहकोपयोगी वस्तू, औषधी निर्माण, भांडवली वस्तू आणि निर्मिती कंपन्यांच्या समभागावर लक्ष केंद्रित करायला हवे, त्यांचे मूल्यांकन सध्या वाजवी असून दीर्घकाळात फायदा देणारे ठरतील, असा सल्ला जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी दिला.

६.७१ लाख कोटींची मत्ता लयाला!

गुरुवारच्या सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी ६.७१ लाख कोटी रुपयांची मत्ता गमावली आहे. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये अडीच टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ६,७१,०५१.७३ कोटींची घसरण होत ते २,४९,०६,३९४.०८ कोटींपर्यंत खाली आले आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्र घायाळ

गुरुवारच्या सत्रातील घसरणीत, जागतिक अर्थस्थितीवर मदार असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या विप्रोच्या समभागात सर्वाधिक ६.२१ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, टेक मिहद्र, टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि कोटक मिहद्र बँकेचे समभाग घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे आयटीसी, डॉ. रेड्डीज आणि पॉवर ग्रिड या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex retreats points on global selling inflation american capital market ysh
First published on: 20-05-2022 at 00:11 IST