scorecardresearch

आर्थिक वर्षांत सेन्सेक्सकडून १८ टक्के परतावा!

आर्थिक वर्षांच्या समापनाला गुरुवारी, भांडवली बाजारात मावळत्या २०२१-२२ प्रमाणे कमालीच्या चढ-उतारासह अस्थिरता दिसून आली

मुंबई : सरलेले आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या अखेरच्या दिवशी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह स्थिरावले. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स , एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसमधील गेल्या तीन सत्रातील तेजींनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नकारात्मक पातळीत प्रवेश केला. तथापि आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सेन्सेक्समध्ये ९,०५९.३६ अंशांची भर पडली. वर्षभरात सेन्सेक्स १८.२९ टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे निफ्टीने २,७७४.०५ अंशांची कमाई करत गुंतवणूकदारांना १८.८८ टक्के परतावा दिला.

आर्थिक वर्षांच्या समापनाला गुरुवारी, भांडवली बाजारात मावळत्या २०२१-२२ प्रमाणे कमालीच्या चढ-उतारासह अस्थिरता दिसून आली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११५.४८ अंशांच्या घसरणीसह ५८,५६८.५१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ५८,८९०.९२ अंशांचा उच्चांक गाठला, तर ५८,४८५.७९ अंशांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३३.५० अंशांची घसरण झाली आणि तो १७,४६४.७५ पातळीवर बंद झाला.

भांडवली बाजारात आर्थिक वर्षांतील अखेरच्या दिवशी प्रमुख निर्देशांक नकारात्मक पातळीवर स्थिरावले असले तरी वर्षभरात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी १८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप-१०० आणि स्मॉलकॅप-१०० निर्देशांकांनी चमकदार कामगिरीच्या जोरावर सरलेल्या आर्थिक वर्षांत २५ टक्क्यांहून परतावा दिला आहे.

भांडवली बाजारातून परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने ऑक्टोबर २०२१ मधील ६२,२४५.४३ अंशांच्या ऐतिहासिक पातळीवरून ‘सेन्सेक्स’ खाली आला, तरी वर्षांअखेर चांगला परतावा दिल्याने देशांतर्गत गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ करणारा आहे, असे मत एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex returns 18 percent in financial year 2021 22 zws

ताज्या बातम्या