पुन्हा तेजी पंथाला!

सेन्सेक्सची ५१४ अंश झेप; निफ्टी १७,२०० पुढे

sensex-bse
संग्रहीत छायाचित्र

सेन्सेक्सची ५१४ अंश झेप; निफ्टी १७,२०० पुढे

मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय भांडवली बाजाराने एका दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पुन्हा तेजीचा मार्ग निवडला. आघाडीच्या समभागांना मिळालेल्या खरेदीच्या पाठबळाने सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांकांना नव्या विक्रमी पातळीकडे झेप घेण्याचे बळ मिळाले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५१४.३३ अंशांनी वधारून ५७,८५२.५४ पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १७,२४५.५० अंशांच्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर निफ्टीमध्ये १५७.९० अंशांनी वाढ होऊन, या निर्देशांकाने १७,२३४.१५ पातळीवर बंद नोंदविला. सेन्सेक्समध्ये वजनदार स्थान असणाऱ्या टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज,९ हिंदुस्थान युनिलिव्हरच्या यांसारख्या कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने बाजारात तेजीचे वारे होते. बुधवारचे नुकसान यातून भरून निघू शकले आणि निर्देशांक पुन्हा तेजीच्या मार्गावर परतले.

सेन्सेक्समध्ये टीसीएसचा समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, कोटक बँक, डॉ रेड्डीज आणि टायटन यांनी वाढ साधली. मात्र, महिंद्र, बजाज ऑटो, बजाज फिनसव्‍‌र्ह आणि एशियन पेंट्सच्या समभागांमध्ये पीछेहाट दिसून आली.

क्षेत्रीय पातळीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक आणि वाहन निर्माती क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात तेजीत व्यवहार सुरू होते. गुंतवणूकदारांचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदीचा जोर होता.

अपेक्षेप्रमाणे झालेले जीएसटी संकलन, वाढती रेल्वे मालवाहतूक, वाहन क्षेत्रात सेमी-कंडक्टरची समस्या असूनही ऑगस्टमधील समाधानकारक वाहन विक्री या घटकांमुळे अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे लक्षणे दिसत आहेत. अग्रणी समभागातील खरेदी उत्साह यातून परतल्याचे दिसले.

बिनोद मोदी, रिलायन्स सिक्युरिटीज

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex rises 514 pts nifty ends above 17200 zws

ताज्या बातम्या