बाजारात खरेदी उत्साह परतला ! ‘सेन्सेक्स’ची ४५४ अंश उसळी

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग ६ टक्के तेजी दर्शवत आघाडीवर राहिला.

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत्या महागाईसंबंधाने चिंता आणि युरोपीय देशांमध्ये पुन्हा करोना संसर्गाच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक बाजारांमध्ये संमिश्र वातावरण असतानाही, निर्देशांकात वरचष्मा राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागामध्ये परतलेल्या तेजीने ‘सेन्सेक्स’ने गुरुवारी ४५४ अंशांची उसळी घेतली. 

सुरुवात घसरणीसह करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ दिवसअखेर ४५४.१० अंशांनी वधारून ५८,७९५.०९ पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात या निर्देशांकाने ५८,१४३.८६ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. मात्र दुपारच्या सत्रात सेन्सेक्स सावरला आणि घसरण पूर्णपणे भरून काढत नीचांकी पातळीपासून तब्बल ७५८ अंशांची आघाडी घेत तो ५८,९०१.५८ अंशांच्या उच्चांकी पातळीला उसळलेला दिसून आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १२१.२० अंशांनी वधारला आणि दिवसअखेर तो १७,५३६.२५ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग ६ टक्के तेजी दर्शवत आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ आयटीसी, इन्फोसिस, टेक महिंद्र, टायटन, भारती एअरटेल आणि पॉवर ग्रिडचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे, मारुती, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि लार्सन अँड टुब्रोचे समभाग घसरणीसह बंद झाले.

क्षेत्रीय पातळीवर, ऊ र्जा, आरोग्य सेवा, तेल आणि वायू, दूरसंचार आणि गृह निर्माण निर्देशांक प्रत्येकी ४.४७ टक्क्य़ांपर्यंत वधारले, तर भांडवली वस्तू, वाहननिर्मिती, बँक निर्देशांक आणि वित्तीय सेवा निर्देशांकात घसरण झाली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.८७ टक्क्य़ांनी वधारले.

खरेदीला बहर कशामुळे?

युरोपात वाढती करोनाची रुग्णसंख्या आणि काही ठिकाणी त्यावर नियंत्रणासाठी अनुसरले गेलेले टाळेबंदीसारखे उपाय हे बाजारासाठी चिंताजनक आहेत. ‘बँक ऑफ कोरिया’ने व्याजदरात वाढ केल्याचे आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद उमटले. मात्र या नकारात्मतेकडे दुर्लक्ष करीत निर्देशांकांत वजनदार स्थान राखणाऱ्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने दुपारच्या सत्रादरम्यान बाजार सावरला. जागतिक पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या जोरदार पुनरुत्थानाची अपेक्षा व्यक्त करत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ९.३ टक्के आणि त्यापुढील वर्षांत ७.९ टक्के राहील, असे भाकीत केल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला, असे निरीक्षण आनंद राठीचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोलंकी यांनी नोंदवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex rises by 454 points nifty ends at 17536 zws

Next Story
सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू व्यापार
ताज्या बातम्या