मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक कल आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागात खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्सला गुरुवारी पाच शतकी उसळी घेण्याचे बळ मिळाले. सलग तीन सत्रांत सुरू राहिलेल्या घसरणीनंतर दिसलेली ही उभारी गुंतवणूकदारांचा मूल्यात्मक खरेदीकडे वाढलेला कलही दर्शविते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चढ-उतारांच्या हेलकाव्यांसह सुरुवात करीत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेर ५०३.२७ अंशांच्या कमाईसह ५४,२५२.५३ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ५९६.९६ अंशांची उसळी घेत ५४,३४६.२२ अंशांचा उच्चांक गाठला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४४.३५ अंशांची वाढ झाली आणि तो १६,१७०.१५ पातळीवर स्थिरावला.

भांडवली बाजारात मोठय़ा विक्रीच्या माऱ्यानंतर मंदीवाल्यांचा जोर ओसरला असून, अल्प ते मध्यम कालावधीत बाजारात पुन्हा वाढ दिसण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्टय़ा व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समभागांनी ‘अतिविक्री’ टप्प्यात प्रवेश केला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडूनही विक्रीचे प्रमाण कमी झाल्याने बाजार सावरण्यास मदत झाली आहे. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह आणि देशांतर्गत पातळीवर रिझव्‍‌र्ह बँकेकडून जूनमध्ये महागाई नियंत्रणासाठी हाती घेण्यात येणाऱ्या उपाययोजना या बाजाराची आगामी दिशा निश्चित करतील. रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजना देशांतर्गत बाजारपेठेसाठी सकारात्मक असतील असा आशावाद बळावल्याचे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, नेस्ले, विप्रो, टीसीएस आणि टेक मिहद्र यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अँड टब्रो आणि डॉ. रेड्डीजच्या समभागात घसरण झाली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex rises five centuries global market positive hdfc bank ysh
First published on: 27-05-2022 at 00:12 IST