मुंबई : अस्थिरतेचा वेढा पडलेल्या भांडवली बाजारात सुरुवात दमदार वाढीने सकारात्मक होऊन प्रमुख निर्देशांक गुरुवारच्या व्यवहारातही दिवस सरत असताना वाढ टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरले. परिणामी सलग सातव्या सत्रात निर्देशांक घसरणीसह बंद झाले. रिझव्‍‌र्ह बँकेकडून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या व्याज दरासंबंधी निर्णयापूर्वी थांबा आणि वाट पाहा असे गुंतवणूकदारांचे धोरण राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परकीय गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू राहिलेल्या विक्रीमुळे बाजारावरील ताण वाढल्याचे दिसून आले. परंतु रुपयातील माफक सुधारणेमुळे निर्देशांकांतील घसरणीचे प्रमाण कमी राहू शकले. सत्रारंभीच्या तेजीनंतर, मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ दुपारच्या सत्रात विक्रीच्या दबावाखाली आला आणि दिवसाचे व्यवहार थंडावत असताना १८८.३२ अंशांनी (०.३३ टक्क्यांनी) घसरून ५६,४०९.९६ वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ४०.५० अंश (०.२४ टक्क्यांनी) घसरून १६,८१८.१० या पातळीवर दिवसअखेरीस बंद झाला.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हसह, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी अनुसरलेल्या धोरणाप्रमाणे चिवट चलनवाढीला आळा घालण्यासाठी शुक्रवारी सलग चौथ्यांदा व्याज दर वाढविले जाणे जवळपास अपरिहार्य दिसून येत आहे. आजवर तिने रेपो दर १४० आधारिबदूंनी वाढविला आहे आणि तो ५.९ टक्के असा तीन वर्षांच्या उच्चांकावर नेण्यासाठी त्यात पुन्हा ५० आधारिबदूंनी वाढ केली जाऊ शकते, असा तज्ज्ञांचा कयास आहे. व्याज दरातील आक्रमक वाढ ही बाजाराने गृहीतच धरली आहे. विशेषत: भारत आणि अमेरिका यांच्यातील रोख्यांच्या परताव्यातील तफावत ३४८ आधारिबदू अशा बहुवार्षिक नीचांकी पातळीवर घसरल्याने, परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारापासून दुरावत चालले आहेत. हे पाहता त्याला प्रतिबंध म्हणून शुक्रवारी रेपो दर ५० आधारिबदूंनी वाढून तो स्वागतार्हच ठरेल. मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपाची आतुरतेने वाट पाहिली जात असल्याचे गुरुवारच्या व्यवहारातून दिसून आल्याचे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. व्यापक बाजारात मात्र खरेदीचे वातावरण होते. कारण गुरुवारच्या सत्रात बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.६३ टक्क्यांनी आणि मिडकॅप निर्देशांक ०.३१ टक्क्यांनी वधारला.

रुपयांत मजबुती; २० पैशांनी वाढ

आंतरबँक परकीय चलन बाजारातील भारताचे चलन रुपयाचे अरुंद श्रेणीत व्यवहार झाले, मात्र त्याने दिवसाला निरोप आणि मजबूत पातळीवर दिला. गेले काही दिवस सुरू असलेल्या विक्रमी पडझडीला रोखून, रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी वाढून ८१.७३ पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान एकेसमयी रुपया बुधवारच्या तुलनेत तब्बल ३५ पैशांचे बळ मिळवून प्रति डॉलर ८१.५८ अशा पातळीपर्यंत सावरलेला दिसला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex seventh consecutive fall modest improvement value of the rupee ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST