सेन्सेक्सला ५२५ अंशांचा फटका, निफ्टी १७,४०० खाली

मुंबई : जागतिक बाजारातील प्रतिकूल घडामोडींच्या सावटामुळे सोमवारी सप्ताहारंभी येथील भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. सेन्सेक्समध्ये मोठे योगदान असणाऱ्या एचडीएफसी बँक, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीच्या समभागांमधील मोठ्या घसरणीचा निर्देशांकांनाही जबर फटका बसला.

बाह्य प्रतिकूल बातम्यांच्या परिणामी मुंबई शेअर बाजार निर्देशांक सोमवारी ५२५ अंशांनी गडगडला.  पंधरवड्यात सेन्सेक्सने एकाच व्यवहारात नोंदविलेली ही सर्वात मोठी आपटी आहे. सेन्सेक्स सत्रातील उच्चांकापासून तब्बल ७१२ अंश अंतराने खाली आला. दिवसअखेर सेन्सेक्स ५९ हजारांच्या खाली, ५८,४९०.९३ पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी निर्देशांक १८८.२५ अंश घसरणीसह १७,३९६.९० वर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलच्या समभागाला ९.५८ टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक फटका बसला. त्यापाठोपाठ एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज आणि महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या समभागांची कामगिरी निराशाजनक राहिली. दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसव्र्ह, आयटीसी आणि एचसीएल टेकचे समभाग तेजीत राहिले.

‘जागतिक पातळीवरील दोन घटकांचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. एक म्हणजे अमेरिकी मध्यवर्ती बँकेची आगामी होऊ  घातलेली बैठक आणि चिनी गृहनिर्माण क्षेत्रामध्ये पुन्हा अनिश्चिाततेचे ढग दाटू लागल्याने जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले,’ असे ज्युलियस बेअरचे कार्यकारी संचालक मिलिंद मुछाला म्हणाले.

चीनच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता;  ‘फेड’च्या निर्णयाबाबतही साशंकता 

अमेरिकी फेडरल रिझर्व्हची बैठक मंगळवारपासून सुरू होत आहे. या बैठकीत अर्थप्रोत्साहनपूरक रोखे खरेदी कार्यक्रम गुंडाळण्यासह, व्याजदरासंबंधी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या आर्थिक विकासासंबंधी प्रशद्ब्राचिन्ह निर्माण झाले असून, चीनच्या गृहनिर्माण क्षेत्राच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. याच्या परिणामी जागतिक पातळीवर कमॉडिटी बाजारात वस्तूंच्या किमती लक्षणीय खाली आल्या आहेत.