मुंबई : अमेरिकेसह जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून करण्यात येणारी आक्रमक व्याज दरवाढ आणि भू-राजकीय तणाव यांसारख्या प्रतिकूलतेपायी गुरुवारी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने बुधवारी व्याजदरात पाऊण टक्क्यांची वाढ केलीच आणि चालू वर्षांत होणाऱ्या आगामी दोन पतधोरण बैठकीत तेथे व्याजदरात आणखी १.२५ टक्के वाढ केली जाणे अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३७.०६ टक्क्यांच्या घसरणीसह ५९,११९.७२ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये झालेली ही सलग तिसऱ्या सत्रातील घसरण आहे. एकेसमयी त्याने ६२४ अंश गमावत ५८,८३२.७८ या दिवसभरातील नीचांकी पातळीही दाखविली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८८.५५ अंशांची घसरण झाली आणि तो १७,६२९.८० पातळीवर स्थिरावला.

देशांतर्गत पातळीवर अर्थव्यवस्थेच्या समाधानकारक वाटचालीमुळे भांडवली बाजारात मोठी घसरण झाली नाही. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयात आणखी घसरण झाल्यास परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी देशांतर्गत भांडवली बाजार कमी आकर्षक बनतील, ज्यामुळे परदेशी गुंतवणुकीचे बहिर्गमन सुरू झाल्यास बाजाराच्या कामगिरीवर परिणाम होईल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे टायटन, हिंदूस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, मारुती आणि आयटीसीचे समभाग सर्वाधिक वधारले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex slumps 337 points as us fed hikes policy interest rates zws
First published on: 23-09-2022 at 05:59 IST