बाजाराचीही सिंहगर्जना
गेल्या आठवडय़ात दाणादाण उडालेल्या बँकांच्या समभागांना मोठी मागणी मिळण्यासह, त्यांच्या समभाग मूल्यांनी आणि सेन्सेक्स व निफ्टी या मुख्य निर्देशांकांचीही गेल्या वर्षभरातील सर्वोत्तम उसळी सोमवारी बाजारात दाखविली. सेन्सेक्स तब्बल ५६८ अंशांची झेप घेऊन, २३,५५४.१२ तर निफ्टीने १८२ अंशांच्या उसळीसह ७,२०० नजीक प्रवास केला. तत्पूर्वी आठवडाभर सुरू राहिलेल्या घसरणीत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे १,६३१ अंश आणि ५०८ अंश गमावले आहेत. जुलै २००९ नंतरची ही निर्देशांकातील सलग दुसरी मोठी घसरण मालिका होती.
पडझडीतून सावरलेल्या आशियाई बाजारांचे सकारात्मक पडसाद स्थानिक भांडवली बाजारात सोमवारी उमटले. परिणामी सेन्सेक्सने गत वर्षभरापेक्षा जास्त काळातील सर्वात मोठी, किंबहुना विद्यमान भाजपप्रणीत आघाडीचे सरकार मे २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतरची ही त्यांची दुसरी मोठी झेप ठरली आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१५ रोजी रिझव्र्ह बँकेने अकस्मात केलेल्या पाव टक्क्यांची रेपो दर कपातीच्या आश्चर्यकारक धक्क्याने सेन्सेक्स ७२८.७३ अंश उसळला होता.
आठवडाभर सलगपणे सुरू राहिलेल्या विक्रीच्या सपाटय़ानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकिंग क्षेत्रात दमदार सुधारणा लवकरच जाहीर होतील, असे शुक्रवारी केलेले वक्तव्य बाजारासाठी आश्वासक ठरले. आशियाई बाजारातील निर्देशांकात दिसलेली दमदार तेजीही बाजाराच्या मूड पालटासाठी उपकारक ठरली. तसेच सलग १५ व्या महिन्यांत उणे ०.९ टक्के असा जानेवारी महिन्याचा घाऊक किमतींवर आधारित महागाई दर आणि परिणामी व्याजदर कपातीच्या दृष्टीने वाढलेल्या आशाही बँकांच्या समभागांना मागणी वाढण्यास कारणीभूत ठरल्या.
बँकिंग अग्रणी स्टेट बँकेचा समभाग ७.९४ टक्के वधारला, तर बँकिंग क्षेत्रातील सर्वाधिक ३,३०० कोटींहून अधिक तिमाही तोटय़ाचा निकाल शनिवारी जाहीर करणाऱ्या बँक ऑफ बडोदाचा समभागही तब्बल २२ टक्क्यांनी वधारला.

सोने झाकोळले
मुंबई : शेअर निर्देशांक गटांगळी खात असताना, अकस्मात तेजीने प्रति तोळा २९ हजारांपल्याड मजल गाठणाऱ्या सोन्याची लकाकी सोमवारच्या ‘सेन्सेक्स’च्या उसळीनंतर झाकोळल्याचे आढळून आले. मुंबईच्या सराफ बाजारात २४ कॅरेट स्टँडर्ड सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ६९५ रुपयांनी कोसळून २८,४१५ रुपयांवर रोडावला. तर शुद्ध चांदीही किलोमागे ९६५ रुपयांनी कोसळून ३७,२१० रुपयांवर स्थिरावली. आधीच्या दोन व्यवहारात दोन्ही धातूंचे भाव अनुक्रमे १,२२० रु. आणि १,३९० रुपयांनी कडाडले होते.