मुंबई : दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांची समाधानकारक कामगिरी व सकारात्मक जागतिक संकेतामुळे भांडवली बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढ साधण्यास यशस्वी ठरला. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक योगदान असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मूल्यवाढीसह, वाहन उद्योग व धातू क्षेत्रातील समभागांना आलेली मागणी  निर्देशांकांना बळ देणारी ठरली.

सकारात्मक सुरुवात झाल्यांनतर मंगळवारी दुपारच्या सत्रात बाजारात किंचित वरच्या पातळीवरून घसरण दिसून आली. मात्र तेजीवाल्यांना पुन्हा जोर लावत घसरणीला सावरून घेतले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ३८३.२१ अंशांच्या वाढीसह ६१,३५०.२६ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४३ अंशांची वाढ झाली आणि तो १८,२६८.४० वर दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग ३.९२ टक्कय़ांच्या वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ टायटन, नेस्ले इंडिया, बजाज फायनान्स, टेक महिंद्र, कोटक बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने सर्वोत्तम कामगिरी केली. सेन्सेक्समध्ये सर्वच निर्देशांक सकारात्मक पातळीवर स्थिरावले. गृह निर्माण, धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन निर्मिती आणि ऊ र्जा निर्देशांक ३.४० टक्कय़ांपर्यंत वधारले होते. व्यापक बाजारातील मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी २.२० टक्कय़ांपर्यंत तेजीत होते.