मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हने महागाईला प्रतिबंध म्हणून व्याजदरात अध्र्या टक्क्यांची केलेली वाढ एकंदर अपेक्षेप्रमाणे आणि यापुढील दरवाढीची आक्रमकपणे होणार नसल्याच्या संकेताने जागतिक बाजारात तेजीचे वारे पसरले. गुरुवारी त्याचेच प्रतिबिंब देशांतर्गत भांडवली बाजारातही उमटले. मात्र दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने प्रमुख निर्देशांक दिवसअखेरीस माफक वाढीसह बंद झाले.
दिवसअखेर सेन्सेक्स सलग तीन सत्रांतील घसरणीला लगाम घालत ३३.२० अंशांच्या वाढीसह ५५,७०२.२३ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ५६,५६६.८० या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. तर निफ्टीमध्ये ५.०५ अंशांची वाढ झाली आणि तो १६,६८२.६५ पातळीवर स्थिरावला.
अमेरिकेतील महागाई दर गेल्या ४० वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने फेडरल रिझव्र्हने बुधवारी व्याजदरात अध्र्या टक्क्याची वाढ केली. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेली ही सर्वात मोठी व्याजदर वाढ असून, मार्चनंतरची ही सलग दुसरी वाढ आहे. मात्र फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी आगामी बैठकीत जशी भाकिते केली जात आहेत त्याप्रमाणे पाऊण टक्क्याची वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले. ज्यामुळे अमेरिकी बाजारात गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
गेल्या काही दिवसांपासून फेडरल रिझव्र्हकडून आक्रमकपणे दरवाढ होण्याच्या भीतीने जागतिक बाजारात मोठय़ा प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र फेडने केवळ ५० आधार बिंदूंची वाढ केल्याने गुंतवणूकदारांची चिंता कमी झाली, ज्यामुळे जागतिक बाजाराला तेजीचे वातावरण निर्माण झाले.