Share Market News Today 24 June 2022 शेअर बाजारातील पडझडीला काहीसा लगाम बसला असून शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्सने ६४४ अंकांची उसळी घेतली. काल दुसऱ्या सहामाहीत बाजारात तेजी होती, ती आजही कायम आहे. निफ्टीमधील बँक आणि वाहन समभागांच्या अष्टपैलू तेजीमुळे बाजार वरच्या श्रेणीत व्यवहार करत आहे.

आज बाजाराच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत सेन्सेक्सने ६४४.१५ अंकांची उसळी घेत ५२,९०९,८७ ची पातळी ओलांडली आहे. तर निफ्टीमध्ये १९२.६ अंकांची वाढ झाली असून तो १५,७४९,२५ पातळीवर स्थिरावला.

बँकेचे समभाग सर्वाधिक तेजीत

बाजारत आलेल्या तेजीमुळे इंडसइंड बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ रेड्डीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, पॉवर ग्रिड आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात घसरण नोंदवली गेली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिलासादायक वृत्त
देशाच्या पूर्वेकडील भागात नैर्ऋत्य मान्सूनची समाधानकारक प्रगती आणि जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत आलेल्या उतारामुळे देशांतर्गत पातळीवर वाहननिर्मिती कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून आली. तसेच अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित निर्यात सरलेल्या मे महिन्यात ९.७९ अब्ज डॉलरवर पोहोचली असून त्यात मासिक आधारावर १३.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आणि त्या परिणामी गेल्या काही महिन्यांपासून घसरणीचा सामना करत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिलासादायक वृत्त आहे, असे मत एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विभागाचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी यांनी व्यक्त केले.

गुरुवारीही शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स ४४३.१९ अंकांनी (०.८६ टक्के) वधारुन ५२.२६५.७१ पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी १४३.३५ अंकांनी(०.९० टक्के)वधारुन १५.५५६.६५ अंकावर पोहचली होती.

रुपयात घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण क्रम सुरू असून गुरुवारी रुपयाने ७८.३२ रुपयांचा नवीन ऐतिहासिक तळ गाठला आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या निधीच्या निर्गमनामुळे डॉलरला अधिक बळ मिळाले आहे. गुरुवारी ७८.२८ या नीचांकी पातळीपासून रुपयाच्या व्यवहारास सुरुवात झाली. दिवसअखेरीस १९ पैशांची तूट दर्शवत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ७८.३२ या सार्वकालिक नीचांकपदी जाऊन स्थिरावले.