सलग तीन सत्रातील घसरण मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी एकाच व्यवहारात भरून काढली. विश्लेषकांच्या अंदाजांपेक्षा सरस तिमाही वित्तीय  कामगिरी बजावणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये विदेशी गुंतवणूक वाढल्याने सेन्सेक्स एकदम ३५१.६१ अंश वधारून पुन्हा २२,५०० पुढे, २२,६२८.८४ वर पोहोचला, निफ्टीतही १०४.१० अंश वाढ होऊन आता ६,८०० नजीक म्हणजे ६,७७९.४० वर स्थिरावला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या चिंतेत भर घालणाऱ्या मार्चमधील वाढत्या महागाईनंतर रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यताच संपल्याने गेल्या सलग तीन व्यवहारात भांडवली बाजाराने घसरण दाखविली. सेन्सेक्सने या तीनही सत्रात मिळून ४३८.१० अंश घट नोंदविली. यामुळे बुधवारी मुंबई निर्देशांक २२,२७७.२३ वर येऊन ठेपला होता, तर निफ्टीनेही त्याचा ६,७०० चा स्तर सोडला होता.
मंगळवारपासून यंदाच्या त्रमासिक निकालांच्या हंगामाचा बार घसघशीत नफावाढीसह इन्फोसिसने फोडल्यानंतर, बुधवारी बाजार व्यवहारानंतर जाहीर झालेल्या निकालांद्वारे देशातील सर्वात मोठय़ा टीसीएस या माहिती तंत्रज्ञान कंपनीनेही जवळपास ५० टक्क्यांची नफ्यातील वाढ राखली. गुरुवारच्या शेअर बाजारातील तेजीतील व्यवहारासाठी एचसीएल टेक व माईंडट्रीचेही निकाल कारणीभूत ठरले.
जोडीला आशियाई, युरोपीय व अमेरिकन शेअर बाजारांतील वधारणेचीही इथे साथ दिसली. आयटीसह बांधकाम, वाहन, पोलाद क्षेत्रातील समभागांमध्येही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी रस दाखविला. बँक समभागही आघाडीवर राहिले. सेन्सेक्समध्ये स्टेट बँकेच्या समभागाचीच आगेकूच होती, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये २.७ टक्क्यांसह बांधकाम निर्देशांक सर्वाधिक उंचावला.
सेन्सेक्समध्ये केवळ एचडीएफसी बँक घसरता राहिला, तर सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक वधारले. निफ्टीने व्यवहारात ६,८०० या पातळीला स्पर्श केल्यानंतर दिवसअखेर काहीशी माघार घेतली. दरम्यान, परकी चलन व्यवहारात रुपया गुरुवारी डॉलरच्या तुलनेत ८ पैशांनी भक्कम होत ६०.२९ पर्यंत पोहोचला. भांडवली बाजाराप्रमाणे गेल्या सलग तीन सत्रात त्यानेही घसरण नोंदविली होती. या दरम्यान तो ३० पैशांनी कमकुवत बनला होता.