पीटीआय, नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती क्षेत्राबरोबरच सरलेल्या सप्टेंबर महिन्यात सेवा क्षेत्राची कामगिरी निराशाजनक राहिली. सेवा क्षेत्रातील व्यावसायिक क्रियाकलाप हे मागील सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर रोडावल्याचे मासिक सर्वेक्षणात दिसून आले. स्पर्धात्मक दबाव, वाढलेली महागाई आणि एकंदर नवीन मागणी कमी झाल्याच्या परिणामी या क्षेत्राची गती मंदावल्याचे दिसून आले.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया सव्‍‌र्हिसेस पीएमआय’ निर्देशांक सप्टेंबर महिन्यात ५४.३ गुणांवर नोंदवला गेला. ऑगस्टमधील ५७.२ गुणांच्या तुलनेत या निर्देशांकात जवळपास २.९ गुणांची पडझड झाली आहे. मासिक तुलनेतील ही आकडेवारी वर्तमान परिस्थितीत सेवा क्षेत्रापुढे काही आव्हाने असल्याचे दर्शविणारी असली, तरी सलग चौदाव्या महिन्यात सेवा क्षेत्रातील उत्पादनाने विस्तारदर्शक कल दर्शविला आहे.

भारताच्या निर्मिती क्षेत्रासंबंधी मंगळवारी जाहीर झालेला पीएमआय निर्देशांक ५५.१ असा तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर नोंदवला गेला आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, ऑगस्टमध्ये जास्त विक्री नोंदवणाऱ्या सेवा प्रदात्यांसाठी अनुकूल मागणीची परिस्थिती होती, मात्र तीव्र स्पर्धा आणि प्रतिकूल धोरण आणि सेवा क्षेत्रातील दरवाढ व महागाईमुळे या क्षेत्राच्या गतीला बाधा आणली आहे. पीएमआय निर्देशांकात घसरण झाली असली तरीही या क्षेत्रात वाढ कायम आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने आक्रमक व्याजदर वाढ केल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयांत मोठी घसरण झाली, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत, असे निरीक्षण ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी गुरुवारी नोंदविले. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीमुळे आयात अधिक महाग होत आहे आणि त्या परिणामी महागाई वाढत आहे. परिणामी मध्यवर्ती बँकेकडून महागाई कमी करण्यासाठी रेपो दरात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे, असेही लिमा म्हणाल्या.

महागाई अपायकारक

किमतीच्या आघाडीवर, सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या सरासरी खर्चात आणखी वाढ अनुभवली. अन्न, इंधन, कार्यालयीन साहित्य, कर्मचारी वेतन खर्च, किरकोळ खर्च आणि वाहतूक हे महागाईच्या अंगाने दबाव आणणारे प्रमुख स्रोत म्हणून नमूद करण्यात आले आहेत. यामुळे सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या खर्चात तीव्र रूपात वाढ झाल्याने नफा टिकवून ठेवण्यासाठी सेवा क्षेत्रातील कंपन्यांना कसरत करावी लागते आहे. मात्र रोजगाराच्या बाबतीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यामध्ये वाढ नोंदवण्यात आल्याचे सर्वेक्षण सांगते.