नवी दिल्ली : रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांनी म्हणजे डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्राने अधिकृत आदेशाद्वारे गुरुवारी सायंकाळी उशिरा प्रसृत केला.

रिझव्‍‌र्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून दास यांची ११ डिसेंबर २०१८ रोजी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना दिलेला तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या १० डिसेंबरला संपुष्टात येणार होता. त्यांचे पूर्वसुरी ऊर्जित पटेल यांनी त्यांची मुदत पूर्ण होण्याआधी अचानक राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी दास यांची नियुक्ती केली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने माजी सनदी अधिकारी असलेले दास यांना १० डिसेंबर २०२१ नंतर तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत पुनर्नियुक्तीचा निर्णय घेतला आणि गुरुवारी सायंकाळी त्या संबंधाने अधिकृत आदेशही निघाला.

करोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकाळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने योजलेल्या जवळपास १०० हून अधिक उपाययोजनांच्या आखणीत गव्हर्नर या नात्याने दास यांच्या योगदानाची दखल घेण्यासह, या कामात सातत्य राहावे या दृष्टीने त्यांना मिळालेली मुदतवाढ महत्त्वाची ठरेल.

केंद्रात भाजप सरकार २०१४ सालात सत्तेत आल्यानंतर, मुदतवाढ मिळालेले दास हे पहिलेच गव्हर्नर आहेत. २०१६ सालात रघुराम राजन यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर मुदतवाढीस नकार दर्शविला, तर त्यानंतर आलेले ऊर्जित पटेल हे मुदतपूर्व राजीनामा देऊन पायउतार झाले.