शेअर बाजाराचा : फुकाचे मुखी बोलता काय वेचे?

‘पापाने एक पाऊल जरी उचलले तरी त्याच्या पुढील सात टापांचा आवाज मला ऐकू येतो,’ असे एक सुंदर वाक्य नाटककार स्व. शं. ना. नवरे यांच्या एका नाटकात आहे.

‘पापाने एक पाऊल जरी उचलले तरी त्याच्या पुढील सात टापांचा आवाज मला ऐकू येतो,’ असे एक सुंदर वाक्य नाटककार स्व. शं. ना. नवरे यांच्या एका नाटकात आहे. याची आठवण व्हायचे कारण म्हणजे एखादा वाचक ‘३६ हजार रुपयांना एक सॉफ्टवेअर मिळते आहे, जे कुठच्या शेअरचा भाव कधी वाढेल, तो शेअर कधी घ्यावा वगरे मार्गदर्शन अचूक करते अगदी गॅरंटीसह ..ते विकत घेऊ का’ असा प्रश्न विचारतो तेव्हा मला खात्री असते की पुढील चार-पाच दिवसांत असे शेकडो फोन येणार आणि तसे ते येतातदेखील. कारण कुणी तरी एक महात्मा जो भारतातील गुंतवणूकदारांचा तारणहार म्हणून अवतार घेता झाला आहे आणि त्यांचे दारिद्रय़ दूर करायचा त्याने जणू काही विडाच उचलला आहे, अशा थाटात अशा सॉफ्टवेअरची जाहिरात करीत असणार हे मला कळते. अधूनमधून अशा प्रकारची आश्वासने देणारे मेळावे होत असतात. पण आजकाल निदान बरेच लोक सॉफ्टवेअरसाठी पसे मोजण्याच्या अगोदर निदान मला विचारतात तरी. अन्यथा ‘आधी केले मग सांगितले’ असा अनेकांचा खाक्या असतो! काही वर्षांपूर्वी एक कुमार नावाचे एक देवदूत (!) दादर येथे आपल्या अशाच सॉफ्टवेअरचे वितरण करण्यासाठी मेळावे भरविते जाहले! एक कोटी रुपये या सॉफ्टवेअरसाठी मी खर्च केले आहेत, अशी लोणकढी थाप ठोकून ‘केवळ तुम्ही मराठी माणसे आहात म्हणून २२ हजार रुपयांना मी हे तुम्हाला देणार आहे’ वगरे बाता मारू लागले. त्यांचे हे सॉफ्टवेअर बाकी दिसायला खूप आकर्षक होते. विमानतळावर रात्री विमान उतरताना आसपास जे रंगीबेरंगी दिवे लुकलुकत असतात तसा नजारा लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसत होता. ज्या कंपनीच्या नावावर एखादा काजवा चमकत जावा तसे हिरवा ठिपका चमकत जाऊन थांबला की त्या कंपनीचा शेअर घ्या. भाव वाढणारच.. अगदी गॅरन्टी म्हणे. मात्र ही गॅरन्टी लिहून वगरे काही नाही बरे का! वाटल्यास माझ्यामार्फत हे व्यवहार करा असे सांगताच आपण स्वत: शेअर दलाल किंवा उपदलाल आहात का? उपदलाल असल्यास आपला मुख्य दलाल कोण? आपले कार्यालय कुठे आहे? आपण कोणत्या डीपीकडे डिमॅट खाते उघडून देणार? असे प्रश्न विचारताच ‘ब्रोकरची वगरे काही गरज नाही, डिमॅट खाते उघडण्याची गरज नाही’ वगरे अफलातून माहिती हे देवदूत सांगू लागताच ‘डिमॅट खाते उघडल्याशिवाय शेअर बाजारात काहीच व्यवहार करता येत नाहीत, ही वस्तुस्थिती असताना तुम्ही असे कसे सांगता’ इत्यादी प्रश्न विचारताच स्वारी संतापली. ‘गेली ३० वष्रे मी एनएसईवर व्यवहार करतो आहे, कोणत्याही ब्रोकरची मदत न घेता’ असे सांगतानाच त्यांचे पितळ उघडे पडत होते. मुळात सुमारे २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एनएसईमध्ये तुम्ही ३० वष्रे कसे काय व्यवहार करीत आहात! एक गुंतवणूकदार म्हणून कुठल्याही स्टॉक एक्स्चेंजच्या सव्र्हरला तुम्हाला थेट कसा काय प्रवेश मिळू शकेल? अशा प्रश्नांच्या फैरी झडल्यावर ‘तुम्ही फारच शंकेखोर आहात तेव्हा इथे तुम्ही काहीच कमवू शकणार नाही’ असा उपदेश करून जाता जाता त्यांनी ‘वत्सा तुजप्रात कल्याण असो’ असा कटाक्ष टाकून माझी बोळवण केली! त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सदर देवदूताचा मला फोन. अगदी गयावया करीत ‘काल माझी चूक झाली, मी गर बोललो मला माफी करा. तुम्ही आपली ओळख सांगितली असती तर तुम्हाला मी सन्मानाने पुढील रांगेत बसवले असते, तुम्ही गुरुस्थानी आहात तेव्हा कालचा सर्वप्रकार विसरून जा आणि क्षमा करा वगरे आर्जव करू लागले. पडद्यामागे असे घडले होते की उपस्थित श्रोत्यामध्ये कुणीतरी माझ्या व्याख्यानाला आलेला असल्याने मला ओळखत होता. त्याने माझ्याविषयी सांगितल्यामुळे हे महाशय इतके लीन झाले होते. हा प्रसंग घडल्यानंतर त्यांनी मुंबईतील आपले चंबुगवाळे आवरून पुण्यात बस्तान बसवले आणि त्यानंतर त्यांचा मुक्काम काही काळ नाशिक कारागृहात होता, असे एका वाचकाने फोन करून मला कळवले. हे व्हायचेच होते. तात्पर्य, अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये. एका महिन्यात रक्कम दुप्पट होईल, असे कुणीही सांगेल, कारण फुकाचे मुखी बोलता काय वेचे? असा रामदास स्वामींचा श्लोक आहे. हे इतके खात्रीशीर असते तर यांनी स्वत:च आपले सॉफ्टवेअर वापरून दोन लाखांचे पाच कोटी रुपये केले नसते का? असो.
प्रतिसाद..
पुणे येथून शिवम फुलारी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर असे की, शेअर्स विकत घेतल्यापासून ३६५ दिवसांनंतर विकले तर प्राप्तिकर लागत नाही ते कॅलेंडरचे दिवस कामकाजाचे दिवस नाहीत. विवेक कुळकर्णी यांचे डिमॅट खाते आहे. त्यात असलेल्या शेअर्सवर गेल्या सहा-सात वर्षांत काय घडामोडी झाल्या त्याची माहिती हवी आहे. सोपे आहे. आपल्या डीपीकडून गेल्या सात वर्षांचे खाते उतारा मागून घ्या. त्यात कंपनीने दिलेले बोनस शेअर्स, स्प्लिट झाले असतील तर ती सर्व माहिती मिळेल. मात्र जुन्या काळातील खाते उतारा देण्यासाठी डीपी काही आकार लावेल. कारण दर महिन्याला एक विनामूल्य खाते उतारा तुम्हाला तो देत असतोच. डिमॅट करण्यासाठी दिलेले शेअर सर्टििफकेट गहाळ झाले आहे तर काय करावे, अशी विचारणा केली आहे पृथा गोडबोले यांनी. जर डिमॅट प्रक्रिया डीपीद्वारे सुरू झाली असेल तर काही दस्तावेज डीपी भरून आरटीआयकडे देतो म्हणजे डुप्लिकेट सर्टििफकेटसाठी अर्ज करायची गरज नसते. आपले खाते सीडीएसएलमध्ये असेल तर मला खाते क्रमांक कळवावा म्हणजे पुढील तपशील सांगता येईल. सातारा येथून संजय माने यांची तक्रार आहे की डिव्हिडण्ड ईसीएसद्वारे मिळत नाही, कंपनी डिव्हिडण्ड वॉरंट पाठवते. संजयजी, आपण डीपीकडे एक फॉर्म भरून द्यावा, ज्यात बँक खात्याचा पूर्ण तपशील लिहून ईसीएससमोर ‘होय’ असे लिहावे म्हणजे यानंतरची डिव्हिडण्ड थेट बँक खात्यात जमा होतील. ज्या शहरात ईसीएसची सोय आहे तिथे ईसीएसनेच डिव्हिडण्ड द्यावे, असा सेबीचा नियम आहे. मोहन काळे यांच्याकडे दिवू मोटर्सचे शेअर्स आहेत जी कंपनी स्टॉक एक्स्चेंजमधून निलंबित आहे. मात्र हे शेअर्स अन्य डिमॅट खातेदाराच्या खात्यात हस्तांतरित होऊ शकतील, जर संबंधित डिपॉझिटरीत ती कंपनी निलंबित नसेल तर. कारण स्टॉक एक्स्चेंजमध्ये निलंबित पण डिपॉझिटरीत कार्यरत असे असू शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Share information software on rs 36 thousand

ताज्या बातम्या