शेअर बाजार उघडताच घसरणीला सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराची सुरुवात लाल चिन्हाने झाली. पहिल्या पाच मिनिटात सेन्सेक्स ४५८.६४ अंक, तर निफ्टीत १४१.३० अंकांची घसरण नोंदवण्यात आली आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरण पाहता तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला होता. एचसीएल टेक्नॉलॉजीज, ओएनजीसी आणि कोल इंडिया निफ्टीच्या टॉप गेनर्सच्या यादीत होते. हिंदाल्को, बजाज ऑटो, एम अँड एम, एचडीएफसी आणि मारुती सुझुकी निफ्टीच्या टॉप लूजर्सच्या यादीत होते.

आंतरराष्ट्रीय बाजाराचं बोलायचं झाल्यास, डाऊ जोन्स ३७० अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला आहे, तर नॅस्डेक २ टक्क्यांनी घसरला. आयटी समभागांमध्ये मोठी घसरण झाली असून अमेरिकन बाजारात १-२ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकन बाजाराची सुरुवात चांगली झाली मात्र नंतर घसरण वाढत गेली. एअरलाइन समभागांमध्ये खरेदी दिसून आली आणि नेटफ्लिक्सचा समभाग पुन्हा ३.५ टक्क्यांनी घसरला. फेडच्या अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर अमेरिकन बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळाली. फेडचे लक्ष महागाई नियंत्रित करण्यावर आहे.