मुंबई : महिन्यातील वायदापूर्तीलाही भांडवली बाजारावर गुरुवारी विक्रीदबाव राहिला. व्यवहारात ३६ हजारांपुढे राहणारा सेन्सेक्स दिवसअखेर मात्र या टप्प्यापासून ढळला. तर निफ्टीने त्याचा ११ हजारांचा स्तरही सोडला.

३७.९९ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक ३६,८६७.४४ वर तर १५.७० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १०,७९२.५० पर्यंत स्थिरावला. व्यवहारात सेन्सेक्सने ३६,०८५.८५ तर निफ्टीने १०,८६५.७० पर्यंत मजल मारली होती.

प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारच्या रूपात सलग तिसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविली. भारत-पाकिस्तान तणावामुळे येथील भांडवली बाजारात घसरण सुरू आहे. या दरम्यान मुंबई निर्देशांकात ३०० हून अधिक अंशांची आपटी नोंदली गेली आहे.

भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार झाले. बाजारात सकाळी तेजीचे वातावरण होते. यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या अनोख्या टप्प्यापुढे गेले. दिवसअखेर मात्र सेन्सेक्स व निफ्टीवर विक्रीदबाव राहिला.

सायंकाळी चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उप्तादनाचे प्रमाण स्पष्ट होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी नफेखोरीचे धोरण अवलंबिले. घसरत्या डॉलरमुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनीही भांडवली बाजारातून काढता पाय घेतला.

सेन्सेक्समध्ये टीसीएस सर्वाधिक, ३.३८ टक्के घसरण नोंदविणारा समभाग ठरला. तसेच मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, महिंद्र अँड महिंद्र, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, एचसीएल टेक, भारती एअरटेल, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, इंडसइंड बँक, इन्फोसिस आदी जवळपास दोन टक्क्यांपर्यंत घसरले. तर ओएनजीसी ४ टक्क्यांसह तेजीच्या यादीत अव्वल राहिला. कोल इंडिया, वेदांता, एनटीपीसी, येस बँक, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रिज, पॉवरग्रिड, आयटीसी, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स आदी ३ टक्क्यार्ंपत वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान सर्वाधिक एक टक्क्यापर्यंत खाली आला. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप अनुक्रमे ०.८६ व ०.४९ टक्क्यांनी उंचावले.