जागतिक स्तरावरील निराशेच्या संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली आहे. आज शेअर बाजाराची सुरुवात होताच सेनसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १२५० अंकांनी गडगडला तर निफ्टी १७ हजार २०० पर्यंत घसरला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारामध्ये पडझड होण्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. लार्ज कॅप आणि मिड कॅप तसेच स्मॉल कॅपसहीत सर्वच प्रकारच्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाल्याचं फायनॅनशिएल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

बँक, अर्थ, आयटी, आईटी इंडेक्स निफ्टीवर तोट्यात असल्याचं दिसत आहे. अन्य क्षेत्रांमध्येही घसरण दिसत आहे. सध्या सेन्सेक्स १२५५ अंकांनी घसरला असून तो ५७ हजार ५७९ वर आहे. तर निफ्टी ३७८ अंकांनी घसरुन १७ हजार १८१ वर आहे. महत्वाच्या कंपन्यांनाही फटका बसला आहे. सेन्सेक्सवरील ३० पैकी २८ शेअर्समध्ये घसरण आहे. आजचा व्यापार सुरु झाला तेव्हापासून टेक एचएम, आयएनएफव्हाय, एचसीएल, टीसीएस, विप्रो, टाटा स्टील्स, कोटक बँक आणि एचडीएफसी बँक या कंपन्या सर्वाधिक फटका बसलेल्या कंपन्या ठरल्या आहेत.

बाजारातील या पडझडीमुळे लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप जवळजवळ ५.५ लाख कोटींनी घसरली आहे. शुक्रवारी बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे मूल्य २,७६, ९६, १११.६० कोटी इतकं होतं. आज सकाळी ९.२० मिनिटांनी हेच मूल्य २,७१,४८,३३१.१० कोटी इतकं आहे.

एवढ्या पडझडीमागील कारण काय?
मागील सप्ताहाची सुरुवातही घसरणीने झाली होती. अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हच्या अधिकाऱ्याने सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षांच्या जॅक्सन होल परिषदेतील भाषणाबद्दल औत्सुक्य वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाले असून आठवडाभर जोखीम टाळण्याकडेच बाजाराचा कल राहिला असा अंदाज पूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. गेल्या सहा सप्ताहांच्या तेजीनंतर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्याची घसरण शुक्रवारपर्यंत नोंदवण्यात ली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केली. याचबरोबर सरकारी बँकांच्या समभागांना देखील मागणी होती. आज मात्र सर्वांना मोठा फटका बसल्याचं दिसत आहे.