मागच्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन उच्चांक नोंदवणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी १४०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३२ अंकांनी घसरुन १३,३२८ अंकांवर बंद झाला. इंग्लंडमध्ये आढळलेला करोनाचा नवा प्रकार, जगभरात पुन्हा एकदा प्रवासावर येऊ घातलेली निर्बंधे, करोनाच्या लसीबाबत असलेली अनिश्चितता या सगळ्यांचे प्रतिकूल परिणाम शेअरबाजारात उमटलेले सोमवारी बघायला मिळाले. दिवसअखेर सेन्सेक्स ४५,५५४ अंकांवर स्थिरावला.

ओएनजीसी, इंडसइंड बँक, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय आणि एल अँड टीच्या शेअर्समध्ये ८.५४ टक्क्यांनी घसरण झाली. मागच्या आठवडयाच्या शेवटच्या सत्राची सुरुवातच तेजीसह करताना मुंबई निर्देशांक प्रथमच ४७ हजारावर पोहोचला होता. पण करोनाचा नवीन स्ट्रेन आढळला असून जगातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आले आहेत. ब्रिटनमध्ये लॉकडाउन कडक करण्यात आला आहे. या सर्वाचा सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सवर प्रतिकुल परिणाम झाला.

सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नेदरलँड आणि बेल्जिअमनं ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनपासून ७० टक्के संक्रमण होण्याचा जास्त धोका आहे.