‘सेन्सेक्स’ची १,१७० अंशांनी आपटी

एकंदर सोमवारच्या गडगडाने गुंतवणूकदारांच्या ८,२१ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक मूल्य मातीमोल झाले आहे. 

शेती सुधारणा कायद्यांवर सरकारच्या माघारीने नाराजी

मुंबई : शेती सुधारणा कायदे मागे घेण्याच्या घोषणेसह केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या धोरणांबाबत धरसोड वृत्तीवर सोमवारी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सुस्पष्ट नाराजी व्यक्त केली. प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने सात महिन्यांतील सर्वात वाईट घसरण नोंदविताना, १,१७० अंशांची गटांगळी घेतली.

रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या आघाडीच्या समभागातील चार टक्क्य़ांच्या मोठय़ा आपटीसह, व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल आणि मिड कॅप निर्देशांकातील तीन टक्क्य़ांहून मोठी घसरण धडकी भरवणारी ठरली. एकंदरीत बाजारातील सर्वव्यापी विक्रीचा मारा पाहता बाजारावर मंदीवाल्यांनी पकड मिळविल्याचे संकेत दिले गेले. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्समधील पडझड वाढत जात ती १,६२४ अंशांपर्यंत विस्तारली होती. एकंदर सोमवारच्या गडगडाने गुंतवणूकदारांच्या ८,२१ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक मूल्य मातीमोल झाले आहे. 

सलगपणे पाचव्या सत्रात घसरणीचा क्रम कायम राखत, सोमवारच्या व्यवहारात दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास दोन टक्क्य़ांनी गडगडले. सेन्सेक्स गुरुवारच्या तुलनेत १,१७०.१२ अंशांच्या तुटीसह दिवसअखेर ५८,४६५.८९ पातळीवर बंद झाला. चालू वर्षांत १२ एप्रिलनंतरची या निर्देशांकात झालेली सर्वात मोठी घसरण आहे. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने सोमवारच्या व्यवहारात ३८५.२५ अंश गमावले आणि तो दिवस सरत असताना १७,४१६.५५ वर स्थिरावला. या मोठय़ा घसरणीने दोन्ही निर्देशांक हे २० सप्टेंबरला मागे सोडलेल्या पातळीखाली गेले आहे. 

देशातील सर्वात मोठी फिनटेक कंपनी ‘पेटीएम’ने सुचिबद्धतेलाच गुंतवणूकदारांना दिलेल्या मोठय़ा नुकसानीच्या तडाख्याने बाजारातील निराशेच्या भावनेत भर घातली. दोन दिवसांत गुंतवणूकदारांचा ४० टक्के तोटा त्याने केला. सौदी आराम्कोला पेट्रोकेमिकल व्यवसायातील २० टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्तावित करार रद्द करण्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने केलेल्या घोषणेचे प्रतिकूल परिणाम दिसून आले आणि कंपनीचा समभाग तब्बल ४ टक्क्य़ांहून अधिक गडगडला. निर्देशांकांत वजनदार स्थान असणाऱ्या समभागाच्या आपटीचा सेन्सेक्स-निफ्टीच्या गटांगळीत मोठे योगदान राहिले.

आर्थिक सुधारणा-पथाबाबत चिंता

काही राज्यांच्या निवडणुकांवर डोळा ठेवून, केंद्र सरकार आर्थिक सुधारणांच्या मार्गापासून दूर जात असल्याचे संकेत तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेबाबत, सोमवारची मोठी घसरण म्हणजे बाजार सहभागींकडून व्यक्त केली गेलली चिंता आहे, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी मत व्यक्त केले. जागतिक बाजाराच्या कमजोर कलामुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून बाजारातील ओघ आटला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. किंबहुना त्यांच्या निर्गुतवणुकीमुळे देशाच्या विदेशी चलन गंगाजळीवर विपरित परिणाम साधल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेची ताजी आकडेवारी स्पष्ट करते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Share market sensex ends 11 pts lower amid deep sell off nifty closes at 17416 zws

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प
ताज्या बातम्या