गुरूवारी लोकसभेचे निकाल जाहीर झाले. शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात शेअर बाजाराने 248 अंकांची उसळी घेतली. सकाळच्या सत्रात 0.90 टक्क्यांच्या तेजीसह शेअर बाजार 39 हजार 160 अंकांवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजारही 0.84 टक्क्यांच्या तेजीसह 11 हजार 754 अंकांवर उघडला. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झाल्याचे पहायला मिळाले.

गुरूवारी सुरूवातीच्या कलांनंतर पुन्हा एकदा बहुमताचे सरकार येणार असे दिसत असल्याने शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच शेअर बाजाराने ४० हजारांपार मजल मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही 12 हजारांचा टप्पा गाठला होता. परंतु काही वेळानंतर शेअर बाजार 298.82 अंकांनी पडून बंद झाला. अखेरच्या सत्रात शेअर बाजार 38811.39 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजार 11 हजार 682.50 अंकांवर बंद झाला होता.

इंडसइंड बँक, झी इंटरटेनमेंट, अदानी पोर्ट, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि सिप्लाच्या शेयर निफ्टीमध्ये वाढ पहायला मिळाली होती. तर वेदांता, आयशर मोटर्स, आयटीसी, हिंदाल्को आणि बजाज फिनसर्वच्या शेअर्समध्ये घट झाली. केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार येण्याच्या आशेने एक्झिट पोलच्या कलानंतर शेअर बाजारात उत्साह दिसून आला होता.

२० मे रोजी सकाळी शेअर बाजार सुरु होताच शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यानंतर रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या निर्विवाद यशाच्या अंदाजाचे पडसाद उमटले होते. त्यावेळी शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी ३९ हजार ३५२.६७ वर तर निफ्टी ११ हजार ८२८.२५ पर्यंत स्थिरावला होता.