मुंबई : बँकिंग व माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांना एक टक्क्याहून मोठय़ा वाढीचे बळ मिळाले. सलग दोन घसरणीनंतर, बुधवारच्या सत्राची सुरुवातही घसरणीनेच करणाऱ्या स्थानिक बाजारात, दुपारनंतर खुल्या झालेल्या युरोपीय बाजारातील सकारात्मक संकेतांनी तेजीवाल्यांना स्फुरण दिले.

बुधवारचे व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स ५४७.८३ अंशांनी कमाई करत ५५,८१६.३२ अंशांच्या पातळीवर स्थिरावला होता. दुसरीकडे निफ्टीने १५७.९५ अंशांची भर घातली व तो १६,६४१.८० पातळीवर बंद झाला.

देशांतर्गत भांडवली बाजाराचे फेडरल रिझव्‍‌र्हच्या दोन दिवस सुरू राहिलेल्या बैठकीतून पुढे येणाऱ्या निर्णयावर लक्ष लागले आहे. या बैठकीअंती व्याजदरात किती वाढ करण्यात येईल त्यानुसार बाजाराचा आगामी कल निर्धारित होणार आहे. गेल्या महिन्याभरात बाजारातील घसरण कमी झाली आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीचा परिणाम अजूनही निर्देशांकामध्ये प्रतििबबीत झालेला नाही. मात्र मंदीसंबंधाने ही जोखीम कमी होईपर्यंत गुंतवणूकदारांनी चांगली कामगिरी बजावणाऱ्या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याचा सल्ला जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी दिला.

रुपया घसरला

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून आक्रमकपणे व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता असल्याने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा डॉलरची मागणी वाढली आहे. इतर जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलर प्रबळ झाला आहे. याचा परिणाम म्हणून बुधवारच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही १३ पैशांनी घसरून ७९.९१ पातळीवर स्थिरावले.