गुंतवणूकदारांना ३.२८ लाख कोटींचा फटका

सप्ताहाच्या शेवटी मुंबई निर्देशांक ३८ हजाराचा स्तर सोडत ३७,५७६.६२ वर येऊन ठेपला.

येस बँक संकटाचा बाजाराला जबर हादरा

मुंबई : जागतिक भांडवली बाजारातील ओहोटीच्या चिंतेत भारतातील खासगी येस बँकेवरील र्निबधाची भर पडल्याने येथील भांडवली बाजारात आठवडाअखेर हडकंप झाला. सत्राच्या सुरुवातीलाच तब्बल १,५०० अंशांनी सपाटून आपटणारा सेन्सेक्स दिवसअखेर गुरुवारच्या तुलनेत थेट ८९३.९९ अंशांनी कोसळला. तर निफ्टीने त्याचा ११ हजाराचा स्तरही सोडला.

चर्चेतील येस बँक, स्टेट बँकेच्या रोडावत्या समभाग मूल्याने मुंबई शेअर बाजाराला सप्ताहअखेरच्या मोठय़ा निर्देशांक आपटीने ३.२८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य १४४.३१ लाख कोटी रुपयांवर राहिले.

सप्ताहाच्या शेवटी मुंबई निर्देशांक ३८ हजाराचा स्तर सोडत ३७,५७६.६२ वर येऊन ठेपला. तर २७९.५५ अंश घसरणीने ११ हजाराचा टप्पा सोडताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,९८९.४५ पर्यंत स्थिरावला.

दोन्ही प्रमुख निर्देशांकातील एकाच व्यवहारातील आपटी ही जवळपास अडीच टक्क्यांची ठरली. त्याचबरोबर सेन्सेक्स व निफ्टीने सप्ताहातही जवळपास दोन टक्क्यांचे नुकसान सोसले.

भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सायंकाळी उशिराच अमेरिकेतील डाऊ जोन्स, नॅसडॅक आदी प्रमुख निर्देशांकांमध्ये गटांगळी अनुभवली गेली. शुक्रवारी आशियातील इतर भांडवली बाजारांवरही त्याचे सावट पडले. परिणामी आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहाराची सुरुवातच भारतातील सेन्सेक्स व निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी मोठय़ा आपटीने केली.

मुंबई निर्देशांकाने सकाळच्या व्यवहारात १,४०० हून अधिक अंशांची आपटी नोंदविताना ३७,२०० वर येऊन ठेपला. तर निफ्टीने दुपारच्या सत्रापूर्वीच १०,९०० च्या खालचा स्तर अनुभवला.

जागतिक भांडवली बाजाराचे सावट कमी म्हणून की काय, भारतातील येस बँक या खासगी बँकेवरील र्निबधाची भर प्रमुख निर्देशांकांच्या घसरणीत पडली. मोठा हिस्सा घेऊ पाहणाऱ्या स्टेट बँकेच्या चर्चेनंतर लगेचच आलेल्या येस बँकेतून रक्कम काढण्यावर टाकण्यात आलेले निर्बंध व संचालक मंडळ बरखास्तीने गुंतवणूकदारांनी धास्ती व्यक्त केली.

खुद्द येस बँक, स्टेट बँकेसह सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, इंडसइंड बँक, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी यांचे मूल्य सपाटून आपटले. तर बजाज ऑटो, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स हे तेजीच्या यादीत राहिले. सर्व, १९ क्षेत्रीय निर्देशांक ४.४० टक्क्यांपर्यंत घसरले. तर मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक २.३६ टक्क्यांनी खाली आले.

येस बँक समभागाचा पालापाचोळा

महिन्याभरासाठी निर्बंध आलेल्या येस बँकेचा समभाग सत्रअखेर ५६.०४ टक्क्यांनी आपटून १६.२० रुपयांवर स्थिरावला. सत्रात  थेट ८४.९३ टक्क्यांची आपटी घेत समभागाने ५.५५ रुपये असा त्याचा सार्वकालिक नीचांकही नोंदविला. उल्लेखनीय म्हणजे स्टेट बँकेकडून संपादनाच्या वृत्ताला सकारात्मक प्रतिसाद म्हणून गुरुवारी हाच समभाग २७ टक्क्य़ांनी उसळत ३७ रुपयांवर गेला होता. शुक्रवारच्या पडझडीत येस बँकेचे बाजारमूल्य एकाच व्यवहारात ५,२६६.२३ कोटी रुपयांनी रोडावत ४,१३१.७७ कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Share market update investors lose over rs 3 lakh crore on coronavirus fears zws

ताज्या बातम्या