मुंबई : भांडवली बाजारात बँकिंग, धातू आणि वाहन क्षेत्रातील समभागांतील खरेदीने मंगळवारी प्रमुख निर्देशांकांना दोन दिवसांच्या घसरणीतून सावरून वाढ नोंदविता आली. 

मोठय़ा चढ-उतारांसह कमालीच्या अस्थिर राहिलेल्या मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स २५७.४३ अंशांच्या (०.४४ टक्के) कमाईसह ५९,०३१.३० वर स्थिरावला. मात्र या सकारात्मक शेवटापूर्वी दिवसाच्या नीचांकी पातळीपासून १,००० हून अधिक अंशांनी त्याने उसळी घेतली. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभाग कालच्या तुलनेत वाढ साधून बंद झाले तर नऊ समभाग घसरले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ८६.८० अंशांनी (०.५० टक्के) वाढून १७,५७७.५० वर स्थिरावला. निफ्टीतीलही ५० पैकी ४२ घटक समभागांनी वाढ साधली.

चलनवाढीवर नियंत्रणासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हकडून पुन्हा आक्रमकपणे व्याजदरात वाढ केली जाण्याच्या संकेतांनी तेथील अर्थव्यवस्थेबद्दलच अनिश्चितता निर्माण झाल्याने निर्यातप्रधान माहिती-तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील समभागांमध्ये मंगळवारीही विक्रीचा जोर कायम होता. या समभागांमधील नुकसानीमुळे प्रमुख निर्देशांकांच्या उभारीला मर्यादा पडल्या. आशियाई बाजारातील घसरणीचाही परिणाम म्हणून संपूर्ण सत्रावर अस्थिरतेचे सावट राहिले. तथापि, बँकिंग, धातू आणि वाहन समभागांमध्ये उत्तरार्धात झालेल्या खरेदीमुळे निर्देशांकांना नीचांकातून सावरून उसळी घेण्यास मदत झाली आणि दोन दिवसांच्या तोटय़ाची मालिका संपवत निर्देशांक वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समधून, मिहद्र अँड मिहद्र सर्वाधिक ३.७८ टक्क्यांनी वाढला. बजाज फिनसव्‍‌र्ह २.७५ टक्क्यांनी, टायटन २.६ टक्क्यांनी, टाटा स्टील २.३८ टक्क्यांनी, स्टेट बँकेने २.१२ टक्क्यांनी वाढ साधली. कोटक मिहद्र बँक, सन फार्मा आणि इंडसइंड बँक यांनीही मूल्यवाढ नोंदवली. दुसरीकडे, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, हिंदूस्थान युनिलिव्हर, टेक मिहद्र, विप्रो आणि एचडीएफसी बँक हे पिछाडीवर राहिलेले प्रमुख समभाग होते.

आशियातील सोल (कोरिया), टोक्यो (जपान), शांघाय (चीन) आणि हाँगकाँगमधील बाजार घसरले. व्यापक बाजारपेठेत, बीएसई मिडकॅप १.०३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७८ टक्क्यांनी वाढले.