मुंबई : भांडवली बाजारात तेजीचा रथ अविरत सुरू असून बुधवारच्या सत्रात त्यापायी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक टक्क्यांहून अधिक भर घातली गेली. जागतिक बाजारातील सकारात्मकतेतून मिळालेली ऊर्जा, विदेशी गुंतवणूकदारांच्या मूडपालटाने झालेली खरेदी आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये आलेल्या मागणी हे घटक सेन्सेक्सच्या ६३० अंशांच्या मुसंडीस, तर निफ्टीने १६,५०० या महत्त्वपूर्ण पातळीवर पुन्हा फेर धरण्यास मदतकारक ठरले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्स ६२९.९१ अंशांनी म्हणजेच १.१५ टक्क्यांनी वाढून ५५,३९७.५३ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ८६२.८४ अंशांची भर घालत ५५,६३०.२६ अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- निफ्टीमध्ये १८०.३० अंशांची (१.१० टक्के) भर पडली आणि तो १६,५२०.८५ पातळीवर स्थिरावला.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळालेल्या उत्साहवर्धक संकेतांचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी समभागांची जोरदार खरेदी केली. केंद्र सरकारने निर्यात शुल्क आणि इंधनावरील विंडफॉल कर-भार कमी केल्याने त्याचे लाभार्थी तेल उत्पादक कंपन्यांचे समभाग ठरल्याचे दिसून आले. कंपन्यांच्या मजबूत तिमाही कामगिरीमुळे अमेरिकी बाजारात मोठी वाढ दिसून आली. तसेच ऊर्जेबाबत पुरवठय़ाची चिंता कमी झाल्याने युरोपीय बाजारात तेजीचे वातावरण होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून गेल्या दोन-तीन दिवसांत दिसून आली त्याप्रमाणे समभाग खरेदी कायम राहिल्यास देशांतर्गत बाजारात तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

परदेशी गुंतवणूकदार सक्रिय

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भांडवली बाजारात पुन्हा एकदा सक्रिय झाले असून सलग दुसऱ्या सत्रात त्यांच्याकडून विक्रीपेक्षा समभाग खरेदी अधिक राहिली आहे. मंगळवारच्या सत्रातही परदेशी गुंतवणूकदारांनी ९७६.४० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले होते.