शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स १००० अंकांनी गडगडला असून आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधील घसरणीचे पडसाद शेअर बाजारात उमटले. दुसरीकडे रुपयाची घसरणही सुरुच असून रुपयाने गुरूवारी ऐतिहासिक तळ गाठला.

गेले काही दिवस शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असतानाच बुधवारी शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने ४६१ अंकांची मुसंडी घेतली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची भर पडली होती. मात्र, गुरुवारी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना पुन्हा पडझडीच्या त्सुनामीचा तडाखा बसला.

गुरुवारी सकाळी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स जवळपास ९०० अंकांनी गडगडला. सेन्सेक्स १००० अंकांच्या घसरणीसह ३३, ८३३. २७ वर पोहोचला असून निफ्टीतही ३०० अंकांची घसरण झाली. निफ्टीचा निर्देशांक १०, १५९. ९० वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील मंदीचा फटका भारताच्या शेअर बाजारावर बसला.

बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य १८ पैसांनी भक्कम झाले होते. मात्र, गुरुवारी रुपयानेही ऐतिहासिक तळ गाठला. २६ पैशांच्या घसरणीसह रुपयाने ७४. ४६ हा ऐतिहासिक नीचांक गाठला.