वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सरलेल्या आर्थिक वर्षांत अपेक्षित असलेली भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीची प्रारंभिक समभाग विक्री प्रक्रिया, येत्या मे महिन्यात पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. या महाकाय जीवन विमा कंपनीतील ५ टक्के हिस्सा विकू पाहणारे सरकार हा नवीन मुहूर्त गमावू इच्छित नसल्याचे सूत्रांकडून समजते. या माध्यमातून सरकारकडून सुमारे ५०,००० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित आहे.
रशिया- युक्रेनदरम्यानच्या युद्धभडक्यामुळे निर्माण झलेल्या अस्थिरतेने भांडवली बाजारांमध्ये निराशेचे वातावरण पसरल्याने मार्च महिन्यातील नियोजित एलआयसीची भागविक्री पुढे ढकलणे सरकारसाठी भाग ठरले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडवली बाजारातील अस्थिरता बव्हंशी कमी झाली असून देशांतर्गत भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण असल्याने केंद्र सरकार मे महिन्यातच एलआयसीची भागविक्री करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून १३ फेब्रुवारीला ‘सेबी’कडे एलआयसीच्या प्रस्तावित आयपीओसाठी मसुदा प्रस्ताव (डीआरएचपी) दाखल केला होता. त्याची तीन महिन्यांची विहित मुदत येत्या १२ मेला संपत आहे.
अन्यथा २०२३ उजाडेपर्यंत प्रतीक्षा
भागविक्री प्रक्रिया १२ मेनंतर पुढे राबवायची झाल्यास, सरकारकडून पुन्हा नव्याने प्रस्ताव (डीआरएचपी) सादर करावा लागेल आणि अशा प्रसंगी डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल पाहून पुन्हा एकदा एलआयसीचे अंत:स्थापित मूल्य (एम्बेडेड व्हॅल्यू) काढावे लागेल. मूल्यांकनाची ही प्रक्रिया व अन्य सोपस्कार पूर्ण करण्यासाठी २०२३ साल उजाडेपर्यंत वाट पाहावी लागेल.