Shares Paytm 11 percent news of the sale shares by Softbank ysh 95 | Loksatta

सॉफ्टबँककडून हिस्साविक्रीच्या वृत्तानंतर ‘पेटीएम’चा समभाग ११ टक्के गडगडला!

जपानस्थित सॉफ्टबँकने कंपनीतील ४.५ टक्के हिस्सा विकण्याची प्रक्रिया सुरू केल्याच्या वृत्तानंतर पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सच्या समभागात गुरुवारी जवळपास ११ टक्क्यांनी घसरण दिसून आली.

सॉफ्टबँककडून हिस्साविक्रीच्या वृत्तानंतर ‘पेटीएम’चा समभाग ११ टक्के गडगडला!

मुंबई : जपानस्थित सॉफ्टबँकने कंपनीतील ४.५ टक्के हिस्सा विकण्याची प्रक्रिया सुरू केल्याच्या वृत्तानंतर पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सच्या समभागात गुरुवारी जवळपास ११ टक्क्यांनी घसरण दिसून आली. परिणामी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे बाजारमूल्य ४,०२१.८५ कोटी रुपयांनी घसरून ३५,०१३.५२ कोटी रुपये झाले.

मुंबई शेअर बाजारात समभाग गुरुवारी १०.२५ टक्क्यांनी घसरून ५३९.८० रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात तो ५३५.२० रुपयांवर गडगडला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टबँकने बाजारातील व्यवहारामध्ये वन९७ कम्युनिकेशन्समधील ४.५ टक्के हिस्सेदारी सुमारे १,६२७ कोटी रुपयांना विकण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू केली. पेटीएममध्ये भागविक्री आधीपासून गुंतवणूक असणाऱ्यांना त्यांनी धारण केलेल्या समभागांसाठी एक वर्षांचा अनिवार्य धारण (लॉक-इन) कालावधी संपल्यानंतर, विक्रीसाठी खुल्या झालेल्या समभागांबाबत लगेचच सॉफ्टबँकसारख्या एका बडय़ा गुंतवणूकदारांकडून हे पाऊल पडल्याचा एकंदर गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक संदेश गेला. सॉफ्टबँक ही १७.५ टक्के हिस्सेदारीसह पेटीएममधील दुसरी सर्वात मोठी भागधारक आहे.

गेल्या आठवडय़ात, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचरच्या (नायका) भागविक्री आधीपासून गुंतवणूकदारांसाठीही एक वर्षांचा बंधनकारक ‘लॉक-इन’ कालावधी संपुष्टात आला. तथापि त्याचा परिणाम म्हणून संभाव्य समभाग विक्रीला रोखण्यासाठी बक्षीस अर्थात बोनस समभागांची व्यवस्थापनाने घोषणा करून ‘नायका’च्या समभागाला तारल्याचे दिसून आले. तथापि तरी नंतरच्या चार सत्रात हा समभाग तब्बल २० टक्क्य़ांनी गडगडून गुरुवारच्या व्यवहारात १७१ रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. परंतु नंतर नायकाच्या समभागाने या प्रारंभिक घसरणीला झटकत, दिवसअखेरीस ०.६२ टक्के वाढीसह १८५.६० रुपयांवर (बोनसपश्चात सुधारित मूल्य) स्थिरावला. या आधी जुलैमध्ये झोमॅटोच्या मूळ गुंतवणूकदारासाठी लॉक-इन’ कालावधी संपुष्टात आल्यानंतर या समभागांतही अशीच मोठी झडपड दिसून आली होती.

पाच नवोद्यमी कंपन्यांकडून तब्बल दीड लाख कोटी मातीमोल

मागील १६ महिन्यांत भारतातील सर्वात जास्त बोलबाला झालेल्या आणि प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून भांडवली बाजारात पदार्पण केलेल्या  पाच तंत्रज्ञानाधारित कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांनी झोप उडविली आहे. बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून पाचही कंपन्यांचे समभाग गडबडले असून, ज्यातून गुंतवणूकदारांचे तब्बल दीड लाख कोटी रुपये मातीमोल झाले आहेत. पेटीएमसह, झोमॅटो, नायका, डेलिव्हरी, पॉलिसीबझार या अशा पाच कंपन्या आहेत, ज्यांनी त्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या समयी गुंतवणूकदारांकडून मोठय़ा संख्येने भरणा करणारा प्रतिसाद मिळविला होता. मात्र सध्या त्यांचे बाजारमूल्य पर्दापणाच्या वेळी असणाऱ्या मूल्याच्या तुलनेत निम्म्याहून अधिक गडगडले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2022 at 01:26 IST
Next Story
शारदा चिटफंडप्रकरणी ‘सेबी’कडून मालमत्तांचा लिलाव