करोनाचा वाढता प्रादुर्भाव, रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या पैशाला भारताबाहेर पाय फुटण्याला वेग आल्याचे दिसून आले. सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांत परिणामी विक्रमी १.४ लाख कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री विदेशी गुंतवणूकदारांकडून केली गेली. आधीच्या आर्थिक वर्षांत त्यांनी भारतीय भांडवली बाजारात २.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र नवीन आर्थिक वर्षांत एप्रिल महिन्यापासून विदेशी संस्थामक गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय झाले आहेत.

सरलेल्या आर्थिक वर्षांच्या मुख्यत: अंतिम तिमाहीत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारातून मोठय़ा प्रमाणावर समभागांची विक्री करत निधी काढून घेतला. त्याआधी वर्ष २०१८-१९ मध्ये ८८ कोटी, वर्ष २०१५-१६ मध्ये १४,१७१ कोटी आणि वर्ष २००८-०९ मध्ये ४७,७०६ कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी गेली होती. एकूणच, विदेशी गुंतवणूकदारांकडून आर्थिक वर्ष २०२१-२२ची सुरुवात निराशेने झाली. एप्रिल-मे २०२१ दरम्यान विदेशी १२,६१३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. मात्र मे महिन्याच्या मध्यात गुंतवणूकदारांनी पुन्हा मोर्चा वळविल्याने जूनमध्ये १७,२१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली. दुसरीकडे, विदेशी गुंतवणूकदारांनी २०२१-२२ रोखे बाजारात १,६२८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षांत त्यांनी रोखे बाजारातून ५०,४४३ कोटी रुपयांच्या निधी काढून घेतला होता. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारातून निधी काढून घेण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहे. त्यापैकी एप्रिल-मे २०२१ मध्ये आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वाधिक हानी पोहोचवली, असे मॉर्निगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक, हिमांशू श्रीवास्तव यांनी मत नोंदविले.