उद्योगपती, अभिनेते यांना ई-कॉमर्सची भुरळ पडलेली असतानाच अमेरिकी अमेझॉनने मात्र आघाडीच्या सिने अभियंत्यांची कंपनी असलेल्या बेस्ट डिल टीव्हीत रस दाखविला आहे. विविध दूरचित्रवाहिन्यांच्या व्यासपीठावरून अनेक वस्तूंची विक्री करणारी ही कंपनी अभिनेता अक्षय कुमार व शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांची कंपनी आहे.
या अनोख्या व्यावसायिक भागीदारीद्वारे बेस्ट डिल टीव्हीवरील उत्पादनांना आता वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्सचे व्यासपीठही उपलब्ध होईल. अमेझॉनच्या माध्यमातून तर कंपनीला आघाडीचे व लोकप्रिय दालनही उपलब्ध होत आहे.
यासाठी बुधवारी नवी दिल्लीत कुंद्रा पती-पत्नीसह अमेझॉन इंडियाचे प्रमुख विकास पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत करारही करण्यात आला. उपरोक्त अभिनेते, अभिनेत्रीसह बेस्ट डिल टीव्हीमध्ये फराह खान, बिपाशा बासू यांचीही गुंतवणूक आहे.
बॉलिवूडधारकांकडून चालविणारे जाणारे देशातील अशाप्रकारचे हे पहिले विक्री व्यासपीठ आहे. स्नॅपडिलमार्फत टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी तर गृहनिर्माण, वित्त सेवा क्षेत्रातील ई-कॉमर्समध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही कोटय़वधींची गुंतवणूक केली आहे.