नवी दिल्ली : सरलेल्या आर्थिक वर्षांतील भांडवली बाजारातील दमदार तेजीचा सकारात्मक प्रतििबब म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही उमटले आहे. हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियताही उत्तरोत्तर वाढत असून, सरलेल्या आर्थिक वर्षांत त्यायोगे १.२४ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक आल्याचे आढळून आले.

गुंतवणूकदारांमध्ये दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीत सरलेल्या आर्थिक वर्षांत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. जी त्याआधीच्या आर्थिक वर्षांत ९६,०८० कोटी रुपये राहिली होती. विक्रमी ‘एसआयपी’ योगदानातून गुंतवणूकदारांमधील वाढत्या विश्वासार्हतेला दर्शविले जाण्यासह, म्युच्युअल फंड उद्योगाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे ‘अ‍ॅम्फी’च्या आकडेवारीतून दिसून आले आहे. शिवाय, म्युच्युअल फंड एसआयपी योगदानात पाच वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये ते योगदान ४३,९२१ कोटी रुपये होते.

एसआयपीच्या माध्यमातून येणारा गुंतवणुकीचा मासिक ओघ वाढत असून मार्च २०२१ मधील ९,१८२ कोटी रुपयांवरून, तो मार्च २०२२ मध्ये तो १२,३२८ कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.