scorecardresearch

रोख्यांद्वारे निधी उभारणी सहा वर्षांच्या नीचांकी; २४ टक्के घसरणीसह २०२१-२२ मध्ये ५.८८ कोटींची उभारणी

भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांकडून रोख्यांच्या माध्यमातून होणारी निधी उभारणी सरलेल्या आर्थिक वर्षांत तब्बल २४ टक्क्यांनी रोडावून सहा वर्षांतील नीचांकपदाला गेली आहे, अशी माहिती भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

पीटीआय, नवी दिल्ली : भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांकडून रोख्यांच्या माध्यमातून होणारी निधी उभारणी सरलेल्या आर्थिक वर्षांत तब्बल २४ टक्क्यांनी रोडावून सहा वर्षांतील नीचांकपदाला गेली आहे, अशी माहिती भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांत सूचिबद्ध कंपन्यांकडून ५.८८ लाख कोटी रुपयांचा निधी कंपनी रोख्यांच्या माध्यमातून उभारण्यात आला. जो गेल्या सहा वर्षांतील किमान स्तर आहे. गेल्यावर्षी समभाग बाजारात तेजीचे वातावरण असल्याने आणि बँकांकडूनही अल्प व्याजदरात हिरिरीने पतपुरवठय़ाच्या उपलब्धतेमुळे कंपन्यांनी रोखे बाजाराकडे पाठ केल्याचे दिसून येते. आधीच्या वर्षांत म्हणजेच २०२०-२१ या आर्थिक वर्षांत सूचिबद्ध कंपन्यांकडून रोख्यांच्या माध्यमातून विक्रमी ७.७२ लाख कोटींची निधी उभारणी करण्यात आली होती. तर २०१५-१६ मध्ये सूचिबद्ध कंपन्यांकडून सर्वात कमी म्हणजे ४.५८ लाख कोटींचा निधी उभारण्यात आला होता.

भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्या त्यांचा विस्तार कार्यक्रम आणि खेळत्या भांडवलासाठी आवश्यक निधी उभारणी करण्यासाठी अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) जारी करीत असतात. या माध्यमातून कंपन्या अशा रोख्यांमधील गुंतवणुकीवर स्थिर व्याज उत्पन्नाची हमी गुंतवणूकदारांना देतात. या रोख्यांचे शेअर बाजारात नियमित व्यवहार होत असल्याने हमी दिलेल्या व्याज उत्पन्नापेक्षाही अधिक आकर्षक परतावाही गुंतवणूकदारांना मिळविता येतो. ‘सेबी’कडे उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विविध कंपन्यांकडून १,९९५ वेगवेगळे रोखे विक्रीसाठी बाजारात दाखल केले गेले. तर सरलेल्या आर्थिक वर्षांत फक्त १,४०५ प्रकारचे रोखे बाजारात दाखल झाले होते. संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्राधान्याने विक्री आणि हक्कभाग विक्रीला कंपन्या प्राधान्य देत असल्याने निधी उभारणीचा हा मार्ग सरलेल्या वर्षांमध्ये दुर्लक्षित ठरल्याचे बाजारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, करोनानंतर कंपन्या आता पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्याने चालू आर्थिक वर्षांत कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणावर कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणी केली जाण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षांत व्याजदरांमध्ये देखील वाढीची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने, रोखे बाजारात बहार दिसू शकेल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Six year low fundraising cash companies cash low position ysh

ताज्या बातम्या