‘पीएमसी’ बँकेचे लवकरच विलीनीकरण ; रिझव्‍‌र्ह बँकेच्या मसुद्यात ठेवीदारांच्या हितरक्षणाला प्राधान्य

सेंट्रम समूह आणि देयक व्यासपीठ असलेल्या भारतपे यांनी एकत्र येत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना केली

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने नवी दिल्लीस्थित युनिटी स्मॉल फायनान्स बँकेद्वारे घोटाळेग्रस्त पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या संपादनाला सुकर करण्यासाठी मसुदा आराखडा सोमवारी प्रसिद्ध केला.

विलीनीकरणाच्या योजनेच्या या मसुद्यात युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडून पीएमसी बँकेचे संपादन हे तिच्या ठेव मालमत्तांसह आणि दायित्वाला ताब्यात घेऊन केले जाण्याची कल्पना रिझव्‍‌र्ह बँकेकडून मांडली गेली आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशाला विशेषत: पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असणाऱ्या खातेदारांच्या हितरक्षण होऊ शकेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. या मसुदा योजनेबाबत सूचना आणि हरकती मध्यवर्ती बँकेने सार्वजनिकरित्या मागविल्या असून, त्यासाठी १० डिसेंबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा मुदत कालावधी दिला गेला आहे. त्या पश्चात विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

सेंट्रम समूह आणि देयक व्यासपीठ असलेल्या भारतपे यांनी एकत्र येत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना केली असून, तिचे अलीकडेच मुंबईत कालिना, सांताक्रुझ येथे शाखेसह कार्यान्वयनही सुरू झाले आहे. किमान २०० कोटी रुपयांच्या भांडवल असण्याची नियामकांचे बंधन असताना, ही बँक १,१०० कोटी रुपयांच्या भांडवलासह सुरू झाली आहे. तर सप्टेंबर २०१९ रोजी घोटाळा आणि कर्ज वितरणात अनियमिततेचा सुगावा लागताच, रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले आहेत. तत्कालीन संचालक मंडळातील बहुतांश सदस्य गजाआड असून, बँकेचा कारभाग रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियुक्त प्रशासकाच्या हाती आहे.

आणखी काही संस्थांना दिलासा

ठेव विमा आणि पतहमी महामंडळाच्या योजनेनुसार, पीएमसी बँकेतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींची पूर्णपणे भरपाई केली जाणार आहे. मात्र पीएमसी बँकेत पाच लाख रुपयांच्या मर्यादेहून अधिक रक्कम असणाऱ्या संस्थात्मक ठेवीदारांचे प्रमाणही मोठे आहे. ठेवींसह विलीनीकरणाची रिझव्‍‌र्ह बँकेकडून प्रस्तावित योजना मात्र या संस्थांना  दिलासा देणारी ठरेल. ढोबळ अंदाजानुसार, २१६ नागरी सहकारी बँका आणि तब्बल १,७५४ सहकारी पतसंस्थांकडून बँकेत कोटींच्या घरात ठेवी, शिवाय सहकारी गृहनिर्माण संस्था, शिक्षणसंस्था यांच्याही बँकेत मोठय़ा ठेवी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Small finance bank will take over pmc bank soon zws

ताज्या बातम्या