|| उमाकांत देशपांडे
गुंतवणूकदारांकडून उदंड प्रतिसाद मिळण्याचा बाबा रामदेव यांचा विश्वास

मुंबई : स्वदेशीचा मूलमंत्र असलेल्या रुची सोया आणि पतंजली समूहाची नाममुद्रा जागतिक बाजारपेठेत अव्वल ठरेल, असा विश्वाास पतंजलीचे बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.

पतंजली समूहाकडून संपादित आणि भांडवली बाजारात सूचिबद्ध रुची सोया इंडस्ट्रिज लिमिटेडच्या फेर समभाग विक्रीला (एफपीओ) ‘सेबी’कडून लवकरच मंजुरी अपेक्षित असून गुंतवणूकदारांकडून उदंड प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

पतंजली समूहाकडून रुची सोया इंडस्ट्रिज ही कंपनी २०१९ मध्ये ताब्यात घेतल्यावर १६ रुपयांवर उतरलेल्या समभाग मूल्याने १,१०० रुपयांपर्यंतही मजल मारली होती. आता ४,३०० कोटी रुपये फेर समभाग विक्रीतून उभारणीचे उद्दिष्ट असून त्यापैकी २,६६३ कोटी रुपये कर्जफेड व उर्वरित निधी हा व्यवसाय विस्तारासाठी वापरला जाणार आहे.

रुची सोया व पतंजली समूहाच्या उद्दिष्टांविषयी बाबा रामदेव म्हणाले, खाद्यतेल, बिस्कीट, खाद्य पदार्थ, सकस अन्नपदार्थ अशा प्रकारांमधील असंख्य उत्पादने काही देशात व विदेशात लोकप्रिय असून ती आणखी ५० ते १०० देशांच्या बाजारपेठांमध्ये निर्यात करण्याचे उद्दिष्ट समूहाने ठेवले आहे. ५ लाख कोटी रुपयांच्या या तयार खाद्यपदार्थ बाजारपेठेत अधिकाधिक गुंतवणूक वाढवून जागतिक अव्वल स्थान मिळविण्याचे कंपनीचे लक्ष्य असून त्यासाठी ही भागविक्री प्रक्रिया राबवण्यात येत आहे. रुची सोया ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्याने ‘सेबी’कडून काही दिवसांमध्ये या योजनेलाही मान्यता मिळेल.

बाबा रामदेव म्हणाले की, एखाद्या उद्योग समूहाप्रमाणे आमची वाटचाल सुरू असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे. उत्पादनांची गुणवत्ता जपतानाच स्पर्धात्मक दर ठेवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. याद्वारे आर्थिक लाभाचे उद्दिष्ट नसून भागधारकांना लाभ मिळेल आणि समूहाला होणाऱ्या फायद्यातून कंपनी विस्ताराबरोबरच सामाजिक कार्यासाठी निधी उभारणी करण्यात येणार आहे. गुरुकुल पद्धतीने एक लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण, आयुर्वेद व अन्य समाजहितोपयोगी कामे त्यातून होतील, असेही त्यांनी सांगितले.

‘लसीबरोबरच योग-आयुर्वेदाद्वारे करोनावर नियंत्रण’

अ‍ॅलोपॅथीमध्ये दोन-चार आजारांवर संपूर्ण उपाय असून आयुर्वेदातून १०० हून अधिक आजार बरे होतात. मधुमेह, रक्तदाब असे आजार अ‍ॅलोपॅथीच्या माध्यमातून केवळ नियंत्रणात ठेवले जाऊ शकतात. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनी आयुर्वेद आणि योगाची मदत घेतली, तर करोनावर नियंत्रण ठेवता येईल, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला.