दिवाळीच्या तोंडावर सवलतीत सोने खरेदी ; सुवर्ण रोख्यांचा सातवा टप्पा गुंतवणुकीस खुला

यंदाच्या टप्प्यात सुवर्ण रोख्यांच्या प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत ४,७६५ इतकी निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या आगामी चार टप्प्यांची घोषणा केली असून, या रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा सातवा टप्पा सोमवारपासून (२५ ऑक्टोबर) सुरू झाला असून गुंतवणूकदारांना २९ ऑक्टोबर्रयत अर्ज करता येणार आहे. दिवाळीच्या तोंडावर धनत्रयोदशीला (२ नोव्हेंबर) हे रोखे गुंतवणूकदारांना जारी करण्यात येतील.

भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक अत्युच्च टप्प्यावर अनिश्चितता दर्शवित असताना, सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून आणि दिवाळीत होणारी पारंपरिक खरेदी पाहता गुंतवणूकदारांचा सुवर्ण रोख्यांकडे ओढा राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या टप्प्यात सुवर्ण रोख्यांच्या प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत ४,७६५ इतकी निश्चित करण्यात आली आहे. शिवाय जे गुंतवणूकदार ‘डिजिटल’ माध्यमातून खरेदी रक्कम भरतील, त्यांना रोख्याच्या खरेदीवर प्रतिग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. म्हणजेच त्यांना ४,७१५ रुपये प्रतिग्रॅमप्रमाणे सोने मिळविता येणार आहे. सरकारच्या वतीने रिझव्‍‌र्ह बँकेकडून ही रोखे विक्री व्यवस्थापित केली जाते आणि सामान्य ग्राहकांना यासाठी निर्धारित बँकांच्या इंटरनेट बँकिंग अथवा प्रत्यक्ष शाखेतून आणि टपाल कार्यालयातून हे रोखे खरेदी करता येतील.

केंद्र सरकारची हमी असणारे या सुवर्ण रोख्यांमध्ये व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंबांना (एचयूएफ) किमान १ ग्रॅम ते कमाल चार हजार ग्रॅम; तर ट्रस्ट व तत्सम संस्थांसाठी वीस हजार ग्रॅम वजनाचे सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षांत खरेदी करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

चालू वर्षांत सुवर्ण रोखे विक्रीचा आठवा टप्पा २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, नववा टप्पा १० ते १४ जानेवारी २०२२ आणि दहावा टप्पा २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ दरम्यान विक्रीस खुला होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजनाद्वारे पुढेही गुंतवणूक करता येऊ शकेल.

गुंतवणूकदारांना फायदे काय?

सुवर्ण रोख्यांच्या प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत ४,७६५ इतकी निश्चित करण्यात आली आहे. शिवाय जे गुंतवणूकदार ‘डिजिटल’ माध्यमातून खरेदी रक्कम भरतील, त्यांना रोख्याच्या खरेदीवर प्रतिग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. म्हणजेच त्यांना ४,७१५ रुपये प्रतिग्रॅमप्रमाणे सोने मिळविता येणार आहे. शिवाय रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे वितरीत व सरकारची हमी असलेल्या या ८ वर्षे मुदतीच्या रोख्यांवर दरसाल २.५ टक्के व्याज लाभही गुंतवणूकदारांना मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sovereign gold bond series vii opens on monday zws

ताज्या बातम्या