प्रक्रिया शुल्कही माफ

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने सणोत्सवाची भेट म्हणून गृह कर्जावरील व्याजदरात कपात करत ते आता ६.७० टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. शिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारण्याचे बँकेने जाहीर केले आहे.

स्टेट बँकेने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, या कपातीनंतर स्टेट बँकेच्या गृहकर्जाचे व्याज दर हे सर्वात कमी झाले आहेत. सवलतीच्या व्याजदरांमुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल, अशी आशा बँकेने व्यक्त केली आहे.

आता बँकेकडून ग्राहकाच्या पतगुणांकाला (क्रेडिट स्कोअर)अनुसरून, गृहकर्जाची कितीही मोठी रक्कम असली तरी ६.७० टक्के इतक्या कमी व्याजदराने ते उपलब्ध होणार आहे. याआधी ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त गृहकर्जासाठी ७.१५ टक्के व्याज द्यावे लागत होते.

शिवाय कर्ज देताना बँकेने आता पगारदार आणि विनापगारदार असा फरक न करता सर्व ग्राहकांना एकाच दराने गृहकर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी विनापगारदार व्यक्तींना पगारदार व्यक्तींना देण्यात येणाऱ्या गृहकर्जाच्या दरापेक्षा १५ आधार बिंदू (०.१५ टक्के) अधिक व्याजदर लागू करण्यात येत होता. शिवाय बऱ्याच गृहकर्जदारांकडून एका बँकेकडून दुसऱ्या बँकेत गृहकर्ज हस्तांतरित केले जाते. आता स्टेट बँकेने ६.७० टक्के गृहकर्जाची सवलत कर्ज हस्तांतरणाच्या प्रकरणांनाही लागू केली आहे.

स्टेट बँकेने व्याज दरात केलेल्या कपातीनंतर इतर बँकाही व्याज कपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर ग्राहकांसाठी येणाऱ्या काळात आणखी काही दिलासा देणाऱ्या घोषणा होऊ शकतात.

किती बचत होणार?

गृह क र्जाचे व्याजदर आता ७.१५ टक्क्यांवरून ६.७० टक्क्यांवर आल्याने कर्जदारांची ४५ आधार बिंदू अर्थात ०.४५ टक्क्यांची बचत होईल. म्हणजे जी व्यक्ती ३० वर्षांच्या मुदतीसाठी ७५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण कर्ज मुदतीत व्याजापोटी आठ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची बचत करणे शक्य होणार आहे.

बँक ऑफ बडोदाकडूनही कपात

सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने देखील सणासुदीचा हंगाम  बघता गृह आणि वाहन कर्ज दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. व्याजदरात सवलतीबरोबरच बँकेने प्रक्रिया शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बँकेकडून गृहकर्जासाठी ६.७५ टक्के तर वाहन कर्जासाठी ७ टक्के कर्जाचा दर निश्चित करण्यात आला आहे.