‘स्टार्टअप्स’करिता स्वतंत्र शाखाही

संपत्ती व्यवस्थापन सेवा क्षेत्रात शिरकाव करणारी स्टेट बँक ही देशातील पहिली सार्वजनिक बँक ठरली आहे. एरवी खासगी तसेच विदेशी कंपन्यांमार्फत हे क्षेत्र हाताळले जाते.

दक्षिण भारतातून बँकेच्या संपत्ती व्यवस्थापन सेवा व्यवसायाचा शुभारंभ करताना बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी, बँकेच्या आघाडीच्या धोरणात्मक प्राधान्य क्षेत्रामध्ये संपत्ती व्यवस्थापनाचाही आता समावेश असेल, असे यावेळी नमूद केले.

‘एसबीआय एक्स्लुझिफ’ या उत्पादनाद्वारे ही सेवा स्टेट बँक तिच्या ग्राहकांना पुरवेल. तिच्या ‘इ-वेल्थ सेंटर’मधून बँक गुणवत्ता संपर्क व्यवस्थापन सेवा देईल.

तर भारतातील गेल्या काही महिन्यांमधील नव उद्यमी (स्टार्ट अप) क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता स्टेट बँकेने या क्षेत्रासाठी स्वतंत्र शाखा सुरू केली आहे. अशा शाखेचे उद्घाटनही भट्टाचार्य यांच्या हस्ते गुरुवारी झाले. ‘एसबीआय इनक्युब’ नावाच्या या शाखेद्वारे नव उद्यमींना व्यवसाय सहकार्य हेतू सर्वप्रकारचे बँकिंग पाठबळ उभे करण्याचे यावेळी आश्वस्त करण्यात आले. कंपनी उभारणीतील कायदेशीर, कर आदी अडचणीही या अंतर्गत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (नॅशनल बँकिंग ग्रुप-एनबीजी) रजनिश कुमार यांनी यावेळी नव उद्यमींकरिता असेच उपक्रम पुणे आणि नवी दिल्ली परिसरातही सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.